महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ मे ।। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून भारतासाठी मोठी डोकेदुखी ठरत आहेत. एकीकडे भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीवर ट्रम्प यांनी वक्तव्य करून राजकीय तणाव वाढवला आहे तर दुसरीकडे आपल्या टॅरिफ (आयत शुल्क) बाबतच्या निर्णयांनी भारतीय कंपन्यांना धडकी भारावली आहे. भारतावर परस्पर शुल्क आकारणीनंतर आता ट्रम्प यांनी औषधांच्या किमती कमी करण्यासाठी उचललेल्या पावलांचा परिणाम भारतासह जगातील प्रमुख औषध कंपन्यांवर होईल.
अमेरिकी औषधांच्या किंमतीवर ट्रम्प यांचा नवा आदेश
अमेरिकन सरकार प्रिस्क्रिप्शन औषधांच्या किमती 59% कमी करणार असल्याची राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली. अमेरिकेत अशा औषधांच्या किमती कमी करण्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या संदर्भात, ट्रम्प यांनी सोमवारी एका व्यापक कार्यकारी आदेश जारी केला. अमेरिकी सरकारच्या नव्या आदेशानुसार औषध कंपन्यांनी 30 दिवसांच्या आत असे केले नाही तर, त्यांना सरकारकडून मिळणाऱ्या पैशांवर नवीन मर्यादा घालाव्या लागतील.
दरम्यान, आता ट्रम्प यांच्या नवीन आदेशाचा भारतावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. GTRI म्हणजेच ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्हने अहवालात याबद्दल उल्लेख केला आहे. यानुसार, अमेरिकन रुग्णांना याचा फायदा होईल पण, औषध कंपन्या भारतासारख्या देशांमध्ये किमती वाढवण्यासाठी दबाव आणू शकतात. पेटंट कायदे कडक करून हे करता येईल.
ट्रम्पच्या आदेशानुसार रॉबर्ट एफ. केनेडी ज्युनियर यांच्या नेतृत्वाखालील आरोग्य विभागाने औषधांच्या नवीन किमती निश्चित कराव्यात. जर कोणताही करार झाला नाही तर, एक नवीन नियम लागू होईल जो अमेरिकेत औषधांसाठी दिलेली किंमत इतर देशांमधील कमी किमतींशी जोडेल.
भारतात औषधांच्या किमती वाढण्याची भीती
त्याचवेळी, थिंक टँक GTRI ने म्हटले आहे की अमेरिकेतील रुग्णांना स्वस्त औषधांचा फायदा होईल. पण, औषध कंपन्या इतर ठिकाणाहून अधिक पैसे कमवण्याचा प्रयत्न करतील, जे भारतासारख्या देशांमध्ये औषधांच्या किमती वाढवू शकतात. त्यांच्या अहवालात म्हटले आहे की, औषध कंपन्या पेटंट कायदे कडक करण्यासाठी दबाव आणू शकतात. जर हे कायदे कडक झाले तर इतर कंपन्या स्वस्त औषधे बनवू शकणार नाही, ज्यामुळे रुग्णांना महागडी औषधे खरेदी करावी लागतील.
अनेक कंपन्यांवर टांगती तलवार
ट्रम्प यांच्या धोरणाचा जागतिक औषध व्यवसाय मॉडेलवर परिणाम होऊ शकतो. अनेक औषध कंपन्या अमेरिकन बाजारातून त्यांचा व्यवसाय काढून घेऊ शकतात. अनेक भारतीय औषध कंपन्यांचे अमेरिकन बाजारात चांगले अस्तित्व असून त्यांच्या उत्पन्नात अमेरिकन बाजाराचा 30-45 टक्के वाटा आहे. अमेरिकेतील फार्मा जेनेरिक बाजारपेठ मोठी आहे पण, अत्यंत स्पर्धात्मक आहे.