पिंपरी-चिंचवड ; आरटीई अंतर्गत ‘एवढे’ विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – – दि. २५ ऑगस्ट -कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आरटीई प्रवेश प्रक्रिया तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सुरू झाली असली, तरी ऑगस्ट अखेरपर्यंत प्रक्रियेतील पहिल्या टप्प्यात झालेल्या लॉटरीतील विद्यार्थ्यांचेच शंभर टक्के प्रवेश होऊ शकलेले नाही. आरटीईअंतर्गत आतापर्यंत केवळ एक हजार 589 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित झाले असून, लॉटरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी तब्बल तीन हजार 786 विद्यार्थी अजूनही प्राथमिक टप्प्यातील प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत.

शहरातील बहुतांश खासगी शाळा 15 जूनपासून ‘ऑनलाइन’ सुरू झाल्या आहेत. शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालेले असताना दुसरीकडे आरटीईअंतर्गत 25 टक्के जागांसाठी राबवण्यात येत असलेल्या प्रक्रियेला उशीर होत आहे. आरटीईअंतर्गत शहरात सोमवारी सायंकाळपर्यंत सुमारे तीन हजार 786 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित झाले असून, वेगवेगळ्या शाळांमध्ये एक हजार 589 विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्राथमिक टप्पा पूर्ण झाला आहे. प्रवेशाचा प्राथमिक टप्पा पूर्ण केल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांचे अंतिम प्रवेश निश्‍चित केले जात असल्याने या वर्षी आरटीई प्रवेश प्रक्रियेत एकच लॉटरी झालेली असतानाही प्रवेश प्रक्रिया लांबली आहे. आरटीई प्रवेश प्रक्रियेत एकाच सोडतीद्वारे प्रवेशाची संधी मिळणार असून, उर्वरित जागांसाठी प्रतीक्षा यादीही सोडतीच्या वेळी जाहीर करण्यात आली आहे. उपलब्ध जागांच्या तुलनेत अर्जांची संख्या अधिक असल्याने आरटीईद्वारे प्रवेश मिळेल की नाही, याची शाश्‍वती नसल्याने पालकांचा जीव टांगणीला लागला आहे. कारण, शहरातील बहुतांश शाळांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांना मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती वाटत आहे.

या सोडतीत निवड झालेल्या मुलांच्या प्रवेशासाठी पालकांना आवश्‍यक कागदपत्रे पडताळणी समितीसमोर सादर करून प्रवेश निश्‍चित करावा लागत आहे. त्यानंतर रिक्त राहणाऱ्या जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. परंतु अद्याप लॉटरी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचीच प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊ शकलेली नाही. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार असल्याचे दिसून येत आहे. या वर्षी आरटीईची एकच फेरी होणार आहे. दरवर्षीप्रमाणे तीन ते चार फेऱ्या होणार नसल्याने त्याद्वारे सर्व जागा भरण्याची शाश्‍वती देता येणार नाही. 31 ऑगस्टपर्यंत ऍलोटमेंट पत्राची पडताळणी करण्याची संधी आहे. त्यातही प्रतीक्षा यादीत 1, 2, 3 असा प्रतीक्षा क्रमांक दिलेला आहे. त्यामुळे कधी नंबर लागेल, याची शाश्‍वती देता येत नाही. परंतु, लॉटरीनंतर ज्या पालकांना अद्याप एसएमएस प्राप्त झालेला नाही, त्यांनी संकेतस्थळावरून पडताळणी करावी.

शहरातील स्थिती

शाळा : 179
राखीव जागा : 4,475
ऑनलाइन अर्ज : 8,950
लॉटरीत निवड : 3,786
प्राथमिक प्रवेश : 1,589
रिक्त जागा : 2,217
प्रतीक्षेत : 3,786

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *