महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १९ मे ।। भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआय आशिया क्रिकेट परिषदेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात बीसीसीआयने आशिया क्रिकेट परिषदेला पत्र लिहिल्याची माहिती आहे. त्यामुळे पुढील महिन्यात श्रीलंकेत होणाऱ्या महिला इमर्जिंग टीम्स आशिया कप आणि सप्टेंबरमध्ये होणाऱ्या पुरुष आशिया कपमधील भारताच्या सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
पाकिस्तानला धडा शिकवण्याच्या दृष्टीने हा बीसीसीआयचा मास्टरस्ट्रोक मानला जातो आहे. पाकिस्तानची चहूबाजूने कोंडी करण्याच्या भारताचा प्रयत्न आहे. त्याचा भाग म्हणून आता बीबीसीआयने आशिया चषकातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. आशिया क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपद पाकिस्तानचे गृहमंत्री आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांच्याकडे आहे. अशावेळी भारतीय संघ या स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकत नाही, असं भारताने कळवलं आहे.
”पाकिस्तानच्या मंत्र्याकडे आशिया क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपद असताना भारतीय संघ या स्पर्धेत सहभागी होऊ शकत नाही. बीसीसीआयने आशिया क्रिकेट परिषदेला यासंदर्भातील सुचना दिली आहे. त्यानुसार भारत महिला इमर्जिंग टीम्स आशिया कपमधून माघार घेत आहे. तसेच भविष्यातील आशिया कप स्पर्धेत स्पर्धांमधील सहभागालाही तूर्तास स्थगित दिली आहे. आम्ही भारतीय सरकारच्या सतत संपर्कात आहोत,” अशी माहिती बीसीसीआयमधील सुत्रांनी दिली.
भारताच्या या निर्णयानंतर आगामी सप्टेंबरमध्ये होणारी आशिया चषक स्पर्धा स्थगित होण्याची शक्यता आहे. सूत्रांनुसार, भारताशिवाय आशिया कप आयोजित करणे व्यवहार्य नाही, कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांचे बहुतांश प्रायोजक भारतातून येतात. शिवाय, भारत-पाकिस्तान सामन्याशिवाय ही स्पर्धा प्रसारकांना फारशी आकर्षक ठरणार नाही.