महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ मे ।। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी तिचा सासरा राजेंद्र हगवणे आणि मोठा दीर शुशील हगवणे या दोघांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शुक्रवारी पहाटे ताब्यात घेतलं. पण वैष्णवीचा मृत्यू झाल्याच्या तारखेपासून म्हणजेच १६ मे पासून फरार होते. पण आज त्यांना अटक झाली, त्यावेळी ते काय करत होते? हे एका सीसीटीव्हीत कैद झालं आहे. या सीसीटीव्हीच्या आधारेच पोलिसांनी या दोघांचा माग काढला आणि त्यांना ताब्यात घेतलं.
बावधन पोलिसांनी शुक्रवारी पहाटे स्वारगेट परिसरातून या दोघांना ताब्यात घेतलं. तत्पूर्वी ते काय करत होते याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. अटकेपूर्वी ते तळेगाव परिसरात वास्तव्याला होते, त्याच ठिकाणी ते आश्रयासाठी फिरत होते. याचदरम्यान इथं एका हॉटेलमध्ये ते जेवण करत होते. याठिकाणी हे दोघं मटणावर ताव मारत असल्याची माहितीही समोर आली आहे. त्यानंतर ते पुण्यातील स्वारगेट परिसरात आले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर साध्यावेशातील पोलिसांनी जाऊन त्यांना ताब्यात घेतलं.
वैष्णवी कसपटे-हगवणे हीनं १६ मे २०२५ रोजी सातत्यानं होत असलेल्या सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली होती. यामध्ये तिचा नवरा शशांक हगवणे, सासरा राजेंद्र हगवणे, सासू लता हगवणे, मोठा दीर सुशील हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे या संपूर्ण कुटुंबानं तिचा सातत्यानं छळ केला. या सर्वांना सध्या पोलिसांनी अटक केली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा राजेंद्र हगवणे सदस्य असल्यानं आणि राजकीय पार्श्वभूमी असल्यानं या कुटुंबातील दोन्ही सुनांवर घरगुती हिंसाचार होत असताना त्यांच्यावर कायम दबाव आणला गेल्याचं समोर आलं आहे.
दरम्यान, याप्रकरणात वैष्णवी हगवणे हीच्या ९ महिन्यांच्या बाळाचा ताबा सध्या तिचे आई-वडील कसपटे कुटुंबाकडं देण्यात आला आहे. काल दिवसभरात हगवणे कुटुंबातील मोठी सून मयुरी जगताप-हगवणे यांनी माध्यमांसमोर त्यांच्यावर झालेल्या अन्याय अत्याचाराचा पाढाच वाचला. त्यानंतर राजकीय आणि पोलीस प्रशासनाच्या तपासाची चक्र वेगानं फिरली आणि आज पहाटे गेल्या सात दिवसांपासून फरार असलेल्या सासू आणि दीराला पोलिसांनी अटक केली.