महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २७ मे ।। महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत मोठा गोंधळ निर्माण झाला असून, संकेतस्थळावरील तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थी व पालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
२१ मे रोजी सुरू झालेली प्रवेश प्रक्रिया संकेतस्थळावरील तांत्रिक बिघाडामुळे थांबविण्यात आली होती. त्यानंतर २६ मे रोजी सकाळी ११ वाजल्यापासून पुन्हा प्रक्रिया सुरू झाली; मात्र पुन्हा एकदा संकेतस्थळ संथ व अस्थिर झाल्याने प्रवेश अर्जाचा दुसरा भाग भरता आला नाही.
अकरावी प्रवेशासाठी दोन टप्प्यांत ऑनलाइन अर्ज सादर करायचा आहे. पहिल्या भागात विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती भरायची असून, हा भाग अनेक विद्यार्थ्यांनी संथगतीने का होईना, पूर्ण केला. मात्र, दुसऱ्या भागात महाविद्यालय निवडीचा पसंतीक्रम भरायचा असून, हे पृष्ठ अनेक वेळा उघडत नव्हते.
त्यामुळे विद्यार्थी आणि पालक संभ्रमावस्थेत सापडले. देवगिरी महाविद्यालयाचे प्रा. नंदकिशोर गायकवाड यांनी सांगितले, की काही विद्यार्थ्यांना ऑनलाइन पेमेंट करता आले नाही. तसेच, काही शाखांचे विषय दिसत नव्हते, ज्यामुळे बायफोकल वगळता इतर पर्याय निवडणे शक्य झाले नाही.
शहरी भागामध्ये ही प्रक्रिया काही प्रमाणात स्थिर झाली असली तरी ग्रामीण भागात मात्र वेगळीच स्थिती आहे. येथे कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या मर्यादित असून, विद्यार्थी घराजवळच्या महाविद्यालयात प्रवेश घेणे पसंत करतात. त्यामुळे ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा फारसा उपयोग होत नसल्याचे शिक्षकांनी सांगितले. शिवाय, या भागात नेटवर्कचा अभाव, मार्गदर्शनाचा अभाव यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. एका संस्थाचालकाने सांगितले, की शिक्षण संचालनालयाने शिक्षकांना ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेबाबत पुरेसे मार्गदर्शन दिलेले नाही. त्यामुळे ते पालकांना योग्य माहिती देऊ शकत नाहीत. राज्य सरकारने त्वरित लक्ष घालून संकेतस्थळाच्या कार्यक्षमतेत सुधारणा करावी, ग्रामीण भागातील शिक्षकांना आवश्यक प्रशिक्षण द्यावे आणि विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.