महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – बार्सिलोना – दि. २६ ऑगस्ट – दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी बार्सिलोना क्लबला अलविदा करण्याच्या तयारीत आहे. मेस्सीने बार्सिलोना क्लबच्या अधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात क्लब सोडण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचे वृत्त आहे.
चॅम्पियन लीग स्पर्धेत नुकताच जर्मनीच्या बायर्न म्युनिकने बार्सिलोनाचा तब्बल ८-२ अशा फरकाने धुव्वा उडवला होता. मेस्सीसारखा दिग्गज खेळाडू असतानाही बार्सिलोना क्लबला प्रथमच दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. १९४६ नंतर बार्सिलोना क्लबने प्रथमच आठ गोल स्वीकारले. क्लबची कामगिरी खालावत असल्याच्या पार्श्वभूमीवर मेस्सीने क्लब सोडण्याची तयारी केली असल्याची माहिती पुढे आली आहे.
अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू असलेल्या मेस्सीच्या वकिलांनी बार्सिलोनाला एक फॅक्स पाठविला आहे. ज्यामध्ये मेस्सीने करार मागे घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मेस्सीचा बार्सिलोनासोबतचा करार पुढील वर्षी म्हणजे २०२१ मध्ये संपणार आहे. मात्र, मेस्सी आणि क्लबच्या काही पदाधिकाऱ्यांत वाद असल्याने तो क्लब सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा क्रीडा क्षेत्रात रंगली आहे.
मेस्सी अवघ्या १३ वर्षाचा असताना बार्सिलोना यूथ अकॅडमीमध्ये दाखल झाला होता. मेस्सी हा बॅलोन डी ऑर पुरस्कार तब्बल सहावेळा जिंकणारा स्टार फुटबॉलपटू आहे.