महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ जून ।। शरद पवार आणि अजित पवार या दोघांची पुन्हा एकदा भेट झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची पुण्यातल्या साखर संकुल या ठिकाणी भेट झाली. या दोघांनी चर्चा कशावर केली? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? याबाबत काहीही प्रतिक्रिया दिली नाही.
अजित पवार किंवा शरद पवारांनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शरद पवार, अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात बंद दारांच्या आड चर्चा झाली. या तिघांमधली बैठक संपल्यावर अजित पवार यांनी साखर संकुल सोडलं. त्यांना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? याबाबत विचारलं असता त्यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही.
सुनील तटकरे यांनी काय म्हटलं आहे?
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र याबाबत काही निर्णय घ्यायचा असेल तर तो शरद पवार आणि अजित पवार हे दोन नेतेच घेऊ शकतात. असं सुनील तटकरेंनी म्हटलं आहे.
सुप्रिया सुळेंनी काय म्हटलं होतं?
दरम्यान दोन ते तीन दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली होती. सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या, ” एकत्र येण्याबाबत काही चर्चा व्हायची असेल तर ती माझ्यात आणि अजित पवारांमध्ये होईल. पण अजित पवारांनी या बाबत आधीच सांगितलं आहे की अशा काही शक्यता नाहीत. त्यामुळे मी देखील तेच सांगेन. बाकी पक्ष एकत्र येतील अशा ज्या चर्चा चालल्या आहेत त्या हवेतल्या गप्पा आहेत.” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या.