महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०८ जून ।। नेकदा बरोबर पत्ता सांगूनही फूड डिलिव्हरी किंवा ऑनलाइन डिलिव्हरी करणाऱ्यांना कर्मचाऱ्यांना कधी कधी घराचा पत्ता सापडत नाही. ऑनलाइन डिलिव्हरीच्या सेवा अचूक आणि वेगाने मिळाव्यात यासाठी टपाल विभागाने दहा अंकी डिजिपीन प्रणाली सुरू केली आहे. त्यामुळं एखाद्या परिसराची किंवा ठिकाणाची अचूक ओळख पटवता येणार आहे. युझर्सना अधिकृत संकेतस्थळावरुन हा क्रमांक मिळवता येणार आहे.
टपाल विभाग गाव, जंगल किंवा समुद्रकिनाऱ्यापर्यंतही अचूक ठिकाणाचा पत्ता पोहोचवू शकतो. या प्रणालीमुळं रुग्णवाहिका, अग्निशमन दल अशा आपतकालीन सेवांना फायदा होणार आहे. तसंच, लॉजिस्टिक्स, कुरिअर डिलिव्हरी, कॅब बुकसाठी वापर करता येईल. तसंच, यामुळं दुर्गम भागातील वितरण सेवा आणखी सुलभ होणार आहे.
डिजिपीनमुळे चुका कमी होऊन कार्यक्षमता आणि सेवांचा वेग वाढण्यात मदत होईल. पोस्टल डिलिव्हरी अधिक अचूक, जलद आणि कार्यक्षम करण्यात फायदा होईल.
पिन कोड, डिजिपीनमधील फरक काय?
सहा अंकी पारंपरिक पिन कोड एका मोठ्या भौगोलिक क्षेत्रासाठी वापरला जातो. डिजिपीन मात्र, विशिष्ट घर किंवा स्थळाच्या नेमक्या ठिकाणासाठी वापरला जाणार आहे.
कसा आणि कुठे जनरेट करावा?
मॅपवरील आपले किंवा घराचे अचूक स्थान सांगणारा डिजिटल पिन स्वतः जनरेट करता येतो. त्यासाठी https://dac.indiapost.gov.in/mydigipin/home या संकेतस्थळाला भेट द्या. येथे तुमच्या डिव्हाइसचे लोकेशन अॅक्सेस दिल्यानंतर 10 अंकी डिजिपीन तयार होईल. हा डिजीपीन तुम्ही पत्ता देताना वापरू शकता.
Digipin आणि पिन कोड यातील फरक काय?
पोस्टल अॅड्रेस म्हणजेच पिन कोड हा एखाद्या ठराविक ठिकाण, रस्ता किंवा घरापर्यंतच मर्यादित असतो. तर, डिजीपिन हा त्या घरासाठी खास तयार केलेला असतो. यामुळं त्या घराचे लोकेशन सापडणे सहज शक्य होते.
डिजीपिन ऑफलाइन उपलब्ध आहे का?
डिजीपिनचा वापर तुम्ही ऑफलाइनदेखील करता येऊ शकतो. पोस्टाने डिजीपिन मिळवण्यासाठी आणि डिकोड करण्यासाठी एक सार्वजनिक डोमेनमध्ये digipin लॉजिकसाठी प्रोग्रामिंग कोड दिला आहे.
DIGIPIN वापरल्याने पोस्टल पत्ता बदलेल का?
तर याचे उत्तर नाहीच आहे. तुमचा मुळ पत्ता तोच राहील. DIGIPIN हा डिजिटल अॅड्रेसिंगचा एक अतिरिक्त पर्याय आहे. जो अधिक अचूक आणि प्रमाणित स्थान ओळखण्यासाठी विद्यमान प्रणालीला पूरक आहे. DIGIPIN अचूक स्थान प्रदान करून पत्ता व्यवस्थापन सुलभ करते. ग्रामीण भाग, जंगले आणि महासागर यासारख्या स्पष्ट पत्ते नसलेल्या भागात DIGIPIN विशेषतः उपयुक्त ठरू शकते.