महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०८ जून ।। व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत आयटीआय प्रवेशासाठी आता 26 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच प्रवेश अर्ज निश्चित करण्यासाठी 27 जूनपर्यंत संधी देण्यात आली आहे.
आयटीआय प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने 15 मे 2025 पासून राबवण्यात येत असून, प्रवेश अर्ज करणे, प्रवेश अर्ज निश्चित करणे आणि पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करणे ही सर्व प्रक्रिया उमेदवारांना 27 जूनपर्यंत करणे आवश्यक असणार आहे. (Latest Pune News)
तर प्राथमिक गुणवत्ता यादी 30 जूनला सकाळी 11 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. अंतिम गुणवत्ता यादी 3 जुलै रोजी प्रकाशित केली जाणार आहे. पहिल्या प्रवेश फेरीसाठी संस्था आणि व्यवसायनिहाय निवड यादी संकेतस्थळावर 9 जुलैला प्रकाशित करण्यात येणार आहे. तसेच 10 ते 15 जुलैदरम्यान विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावा लागणार आहे.
त्यानंतर दुसर्या फेरीची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी 6 जूनपासून चॅटबॉटचीही व्यवस्था सुरू करण्यात आली आहे.चॅटबॉटद्वारे मदत करण्याबरोबरच व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने प्रत्येक विभागात मदत संपर्क क्रमांक दिले आहेत.
आयटीआयसाठी 78,406 इतके प्रवेश निश्चित
राज्यात आयटीआयसाठी एकूण विद्यार्थी नोंदणी 1 लाख 39 हजार 32 एवढी झाली आहे तर 1 लाख 27 हजार 457 विद्यार्थ्यांनी पूर्ण अर्ज भरले आहेत. 1 लाख 25 हजार 5 विद्यार्थ्यांनी शुल्क भरणा केला आहे. तर 78 हजार 406 इतके प्रवेश निश्चित झाले आहेत. पर्यायी अर्ज भरलेले विद्यार्थी 68 हजार 583 इतके आहेत, अशी माहिती ‘व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालया’ने दिली आहे.