महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०८ जून ।। “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीत जागा वाटपात अडचण आली तर पवारसाहेबांचा सल्ला घेऊ,” अशी कोपरखळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना मारली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज्यात सत्ताधारी भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार), शिवसेना (एकनाथ शिंदे) महायुतीत जागा वाटप व्यवस्थित होईल असे वाटत नाही, अशी शंका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख आणि राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपस्थित केली आहे. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली.
उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे युतीची; तसेच दोन ‘राष्ट्रवादी’ एकत्र येण्याच्या चर्चेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, ‘बेगाने शादी मे अब्दुल्ला मी नाही. ते वेगळे पक्ष आहेत. दोन भाऊ आहेत. काका-पुतणे आहेत. त्या दोघांत किती संवाद आहे, हे माहीत नाही. मात्र, माध्यमांचा उतावीळपणा सुरू आहे. मला हात दाखवून अवलक्षण करायचे नाही,’ असा टोला फडणवीस यांनी लगावला. ‘राहुल गांधी यांच्या लेखाला उत्तर लेखातून देण्यात येईल,’ असेही ते म्हणाले.
भाजप कामगार आघाडीचा शहराध्यक्ष ओंकार कदम याला महिला अधिकाऱ्याला दमदाटी केल्याप्रकरणी पालिकेत प्रवेशबंदी करण्यात आली आहे. याबाबत फडणवीस म्हणाले, ‘कोणी चुकीचे वागले, कायदा मोडला तर त्याला सोडणार नाही. मग तो कोणत्याही पक्षाचा असो.’
दरम्यान, ‘पर्यावरणासमोर प्लास्टिक ही सर्वांत मोठी समस्या आहे. जैव विघटनक्षम प्लास्टिक (बायोडिग्रेडेबल प्लास्टिक) हा त्यावरील उपाय असून, त्यादृष्टीने वाटचाल करण्यासाठी धोरण तयार करू,’ असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.