महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ जून ।। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील सहआरोपी नीलेश चव्हाणच्या लॅपटॉपमध्ये महिलांची अश्लील छायाचित्रे, चित्रफिती असण्याची दाट शक्यता असून, लॅपटॉपचा पासवर्ड देण्यास तो जाणीवपूर्वक टाळाटाळ करून उडवाउडवीची उत्तरे देत आहे, असे पुणे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.
पीडित महिलांनी नीलेश चव्हाणच्या दहशतीला घाबरून त्याच्याविरोधात तक्रारी दिल्या नसून, हा लॅपटॉप सुरू झाल्यास त्याच्याविरोधात आणखी गंभीर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यताही पुणे पोलिसांनी वर्तविली.
वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर तिच्या बाळाची हेळसांड करून तिच्या नातेवाइकांना पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावल्याप्रकरणी नीलेश चव्हाणवर वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यात त्याला बुधवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्या वेळी त्याची पोलिस कोठडी मागताना तपासाधिकारी उपनिरीक्षक सचिन तरडे यांनी त्याच्या लॅपटॉपमध्ये महिलांची अश्लील छायाचित्रे आणि चित्रफिती असल्याची शक्यता वर्तविली.
‘चव्हाणचा लॅपटॉप जप्त करण्यात आला असून, त्याच्या पासवर्डबाबत विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देत आहे. या लॅपटॉपमध्ये महिलांच्या अश्लील चित्रफिती असण्याची दाट शक्यता असून, त्याला घाबरून तक्रार देण्यासाठी पीडित महिला पुढे आल्या नसाव्यात. त्याच्याकडून पासवर्ड घेऊन लॅपटॉप सुरू करून याबाबतचे पुरावे मिळाल्यास त्यातून आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे,’ असेही तपासाधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितले.