महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ जून ।। लॉर्ड्स येथे दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) फायनलच्या पहिल्या दिवस गोलंदाजांच्या नावावर राहिला. दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडाने पाच तर मार्को जॅन्सनने तीन बळी घेतल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ २१२ धावांवर आटोपला. शेवटच्या सत्रात ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजांनीही चमकदार कामगिरी केली. मिचेल स्टार्कने दोन बळी घेतले तर पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड यांनी प्रत्येकी एक बळी घेत दक्षिण आफ्रिकाची अवस्या ४ बाद ४३ अशी झाली आहे.
कसोटीत 145 वर्षांमध्ये प्रथमच असं घडलं?
‘डब्ल्यूटीसी’ फायनलचा पहिला दिवस १४५ वर्षांत पहिल्यांदाच एका नकोशा विक्रमाची नोंद झाली. इंग्लंडमधील ५६१ कसोटी सामन्यांमध्ये दोन्ही संघांचे नंबर १ फलंदाज (फलंदाजी क्रमानुसार) पहिल्या डावात शून्यवर बाद झाले. यापूर्वी १८८० मध्ये इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात नंबर १ फलंदाज (फलंदाजी क्रमानुसार) पहिल्या डावात शून्य धावांवर बाद झाले होते. बुधवारी (दि. ११ जून) डब्ल्यूटीसी फायनलच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा उस्मान ख्वाजा आणि दक्षिण आफ्रिकेचा एडेन मार्कराम हे दोघेही शून्यवर बाद झाले. त्यामुळे दोन्ही संघाचे प्रथम फलंदाजी करणारे शून्यवर बाद होण्याची ही १४५ वर्षांमधील पहिलीच वेळ ठरली.
रबाडाचा विकेटचा ‘पंच’
रबाडाच्या भेदक मार्यामुळे कांगारूंचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. ब्यू वेबस्टरने 72, तर स्टिव्ह स्मिथने 66 धावांची लढवय्या खेळी केली; पण इतर फलंदाज अपयशी ठरले.रबाडाने 15.4 षटकांत 51 धावा देत 5 बळी घेतले. त्याला मार्को जॅन्सेनने 3 विकेटस् मिळवून उत्तम साथ दिली. केशव महाराज आणि एडन मार्कराम यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेल्या दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाचा निर्णय त्यांच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने आपल्या भेदक मार्याने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना अडचणीत आणले. त्याने सातव्या षटकात सलामीवीर उस्मान ख्वाजा (12) आणि कॅमेरॉन ग्रीन (4) यांना लागोपाठ बाद करत ऑस्ट्रेलियाला जोरदार धक्के दिले.त्यानंतर मार्को जॅन्सेननेही उत्कृष्ट गोलंदाजी करत मार्नस लॅबुशेन (15) आणि धोकादायक ट्रॅव्हिस हेड (8) यांना तंबूचा रस्ता दाखवला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची अवस्था 4 बाद 67 अशी बिकट झाली होती.
स्मिथने फायनलमध्ये मैदानात उतरताच रचला विक्रम!
या सामन्यादरम्यान, ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टिव्ह स्मिथने एक मोठा विक्रम आपल्या नावे केला. त्याने ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार रिकी पाँटिंग यांच्या सर्वाधिक ‘आयसीसी’ फायनल खेळण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली. विशेष म्हणजे, आतापर्यंत सर्वाधिक ‘आयसीसी’ फायनल खेळण्याचा विक्रम भारताच्या रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या नावावर आहे. ‘आयसीसी’ फायनलमध्ये एकदिवसीय विश्वचषक, टी-20 विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यांचा समावेश होतो. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी प्रत्येकी 9 ‘आयसीसी’ फायनल खेळल्या आहेत.
कागिसो रबाडाचा ऐतिहासिक टप्पा
रबाडाने 5 विकेट घेतल्याने तो दक्षिण आफ्रिकेसाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणार्या गोलंदाजांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याच्या पुढे डेल स्टेन (439), शॉन पोलॉक (421), मखाया एंटिनी (390) हे दिग्गज आहेत. त्याच्या खात्यात 332 बळी जमा झाले आहेत. त्याने अॅलन डोनाल्डचा विक्रम मोडला आहे.