महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ जून ।। मान्सून राज्यात पुन्हा सक्रीय झाला असून येत्या तीन ते चार दिवसात राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. गुरुवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. कोकणसह मध्य महाराष्ट्रात येत्या आठवड्याभरात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
गुरुवारी कोल्हापूर सांगली जिल्ह्यासह विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, अमरावती आणि अकोला जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात यलो अलर्ट जारी करण्यात आलाय.
कोकणात शुक्रवारपासून रविवारपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. शुक्रवारी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.
देशात पावसाचं प्रमाण ३२ टक्के इतकं कमी नोंदवलं गेलं आहे. तरी हवामान विभागाच्या अंदाजानुसार जूनमध्ये १०८ टक्के पावसाची शक्यता आहे. येत्या तीन आठवड्यात देशभरात चांगला पाऊस होऊ शकतो असं हवामान शास्त्रज्ञ केएस होसाळीकर यांनी सांगितलंय. देशात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊ शकते.
दिल्लीला ‘रेड अलर्ट’
देशाच्या राजधानीत उष्णतेच्या तीव्र लाटेचा ‘रेड अलर्ट’ हवामान खात्याने जारी केला आहे. दिल्लीतील अनेक भागांत कमाल तापमान ४५.५ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेची तीव्रता कायम राहण्याचा अंदाज असल्याने दिल्लीकरांना लगेच दिलासा मिळण्याची शक्यता नाही. मात्र, शुक्रवार (ता.१३) आणि शनिवारी (ता.१४) हलक्या पावसाचा अंदाज आहे. दिल्लीसह पंजाब, हरियाना व राजस्थानात गुरुवारपर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.