![]()
महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. २९ जानेवारी | एकेकाळी लग्नसराईत हसतहसत खरेदी होणारी सोन्याची बांगडी आणि चांदीची वाटी आता डोळ्यांत पाणी आणणारी लक्झरी बनू लागली आहे. गुरुवारी पुन्हा एकदा सराफा बाजारात भाव उसळले आणि सोनं २ लाखांच्या दिशेनं तर चांदी थेट ४ लाखांवर झेपावली. एमसीएक्सवर फेब्रुवारी वायदा सोनं तब्बल १० हजारांनी वाढून १ लाख ७५ हजार ८६९ रुपये प्रति १० ग्रॅम झाले, तर चांदी ६ टक्क्यांच्या वाढीसह ४ लाख ६ हजार ८६३ रुपये प्रति किलो या पातळीवर पोहोचली. पगार वाढतोय हळूहळू, पण सोनं-चांदी मात्र धावत सुटल्यासारखी—आणि सामान्य माणूस हातात कॅल्क्युलेटर घेऊन फक्त आकडेमोड करत बसलाय.
या दरवाढीचं कारण काय, असा प्रश्न विचारला तर अर्थतज्ज्ञ लगेच डॉलर, आंतरराष्ट्रीय तणाव, महागाई, गुंतवणूकदारांचा कल आणि सुरक्षित गुंतवणूक अशी मोठीमोठी उत्तरं देतात. पण वास्तव असं की गृहिणीच्या कपाटातली पाटली हलकी होतेय आणि नववधूच्या स्वप्नातलं दागिन्यांचं सेट छोटं होतंय. कालपर्यंत “१० तोळे सोनं” हा प्रतिष्ठेचा मापदंड होता; आज तोच तोळा “विचारपूर्वक” घ्यावा लागतोय. चांदी तर गरीबांची सोनं म्हणून ओळखली जायची; पण आता तीही श्रीमंतीचा शेजार पकडू पाहतेय. बचतीसाठी सोनं घ्या, असं शिकवणारे आज स्वतःच भाव पाहून गप्प बसलेत.
या सगळ्यात प्रश्न असा आहे की हा भाववाढीचा रथ कुठे थांबणार? २ लाख सोनं आणि ४ लाख चांदी हे आकडे फक्त बाजारातले नाहीत, तर मानसिकतेवर घाव घालणारे आहेत. लग्नसराई, सण-उत्सव, गुंतवणूक—सगळ्याच गोष्टींची गणितं बदलत चाललीत. सोनं-चांदी आज केवळ धातू राहिलेले नाहीत; ती आशा, भीती आणि अर्थकारण यांचा आरसा बनली आहेत. एकीकडे गुंतवणूकदार टाळ्या वाजवतायत, तर दुसरीकडे सामान्य माणूस कपाळावर आठ्या आणून विचारतोय—“हे सोनं माझ्यासाठी आहे की फक्त तिजोरीत मोजण्यासाठी?” कारण दर वाढतात तेव्हा फक्त आकडेच नाही, तर स्वप्नांचाही भाव वाढलेला असतो!
