![]()
महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. २९ जानेवारी | सांगली : निरंकारी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन सान्निध्यात मंगळवार, दि. २७ जानेवारी रोजी आयोजित सामूहिक विवाह समारोहात महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांतून आलेल्या ८२ जोडप्यांचा विवाह संपन्न झाला. महाराष्ट्राच्या ५९व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची विधिवत सांगता झाल्यानंतर सांगलवाडी, सांगली–ईश्वरपूर रोड येथील समागम मैदानावर या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या विवाहप्रसंगी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी वधू-वरांचे अभिनंदन करत गृहस्थ जीवनातील जबाबदाऱ्या एकोप्याने, आदराने व प्रेमाने पार पाडण्याचा संदेश दिला. सामाजिक दायित्वे जपत असताना सेवा, सिमरण व सत्संगाशी नित्य जोडलेले राहून परस्पर सहकार्याने भक्ती अधिक दृढ करण्याची प्रेरणाही त्यांनी दिली. कार्यक्रमात पारंपरिक जयमालेसह निरंकारी विवाहाचे विशेष चिन्ह असलेला ‘सांझा-हार’ (सामायिक हार) मिशनच्या प्रतिनिधींमार्फत प्रत्येक जोडप्याच्या गळ्यात अर्पण करण्यात आला. त्यानंतर आदर्श गृहस्थ जीवनाची शिकवण देणाऱ्या निरंकारी लावांचे सुमधुर गायन झाले.
समारंभात सतगुरु माताजी व निरंकारी राजपिताजी यांनी वधू-वरांवर पुष्पवर्षाव करून दिव्य आशीर्वाद दिला. उपस्थित कुटुंबीय व साध संगतनेदेखील पुष्पवर्षाव केला. या सोहळ्यात पुणे, पिंपरी-चिंचवड, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, मुंबई, ठाणे, डोंबिवली, पालघर, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नाशिक, लातूर, बीड, परभणी, नागपूर, वर्धा, गोंदिया, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच उत्तर प्रदेश (गोरखपूर, गाझीपूर, अलाहाबाद), कर्नाटक (बेळगावी, उडुपी–कोंडापूर) आणि छत्तीसगड (अंबिकापूर–सुरगुजा) येथील जोडप्यांचा समावेश होता.
उल्लेखनीय बाब म्हणजे या साध्या विवाहसमारंभात पदवीधर, पदव्युत्तर व उच्चशिक्षित वधू-वर मोठ्या संख्येने सहभागी झाले. काही कुटुंबे भव्य समारंभ करू शकत असतानाही त्यांनी साधेपणा स्वीकारून समाजापुढे आदर्श ठेवला. जाती-वर्णभेद दूर करून एकत्वाचा संदेश देणारा हा सोहळा संत निरंकारी मिशनच्या मूल्यांचे प्रभावी दर्शन घडवणारा ठरला.
