![]()
महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. २९ जानेवारी | महिना बदलतो म्हणजे फक्त कॅलेंडरच नाही, तर सामान्य माणसाचं गणितही बदलतं. जानेवारीची शेवटची तारीख येते आणि घराघरात एकच प्रश्न उभा राहतो—“पुढच्या महिन्यात काय महागणार?” यंदा फेब्रुवारीची सुरुवातच जरा तापलेली आहे. अर्थसंकल्पाची चाहूल लागत असतानाच आधीच काही नियम बदलायला सज्ज झालेत. एलपीजी गॅसपासून सिगारेटपर्यंत आणि फास्टॅगपासून बँकांच्या सुट्ट्यांपर्यंत सगळीकडेच नवे फलक लागणार आहेत. सरकार म्हणतं—हे बदल गरजेचे आहेत; तर नागरिक म्हणतो—खिशात आधीच छिद्रं आहेत, अजून किती?
दर महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलेंडरचा भाव बदलतो, हे आता इतकं सवयीचं झालंय की दूध येण्याआधीच मोबाइलवर गॅसचा मेसेज येईल, अशीच अपेक्षा असते. १ फेब्रुवारीलाही एलपीजीच्या नव्या किंमती जाहीर होणार आहेत. बजेट तोंडावर असल्यामुळे भाव कमी होतील, अशी आशा दाखवली जाते; पण अनुभव सांगतो, “आशा ही स्वस्त आणि गॅस महाग!” दुसरीकडे, सिगारेट, पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांवर कराचा नवा डोस दिला जाणार आहे. आरोग्य आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर—नाव भारी, परिणाम थेट खिशावर. धूर ओढणाऱ्यांसाठी हा फटका आर्थिक आहेच, पण सरकारचा संदेश स्पष्ट आहे—सवयी महाग पडणार. प्रश्न इतकाच, की सवय सुटेल की खर्च वाढेल?
तंत्रज्ञानाच्या बाबतीत मात्र थोडी सवलत मिळतेय. FASTag च्या नियमांमध्ये बदल करून वाहनधारकांना थोडा श्वास देण्यात आला आहे. आधी वाहनाची KYV सक्तीची होती, आता ती जबाबदारी थेट बँकांकडे. म्हणजे वाहनचालकाला “कागद दाखवा”चा खेळ कमी, पण बँकांच्या काउंटरवर रांग वाढण्याची शक्यता जास्त. आणि या सगळ्यात बँकांच्या सुट्ट्यांचा पंचनामा वेगळाच. फेब्रुवारीत दुसरा-चौथा शनिवार, रविवार आणि सणासुदीच्या सुट्ट्या—त्यात १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज जयंती. म्हणजे कामासाठी बँकेत जाणाऱ्याने आधी कॅलेंडर, मग देव आणि शेवटी व्यवस्थापक—सगळ्यांची पूजा करूनच पाऊल टाकावं लागेल. थोडक्यात, फेब्रुवारी येतोय बदलांचा गठ्ठा घेऊन—काही नियम सुलभ, काही खर्चिक; पण नेहमीप्रमाणे सामान्य माणसाने जुळवून घ्यायचंच!
