महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ जून ।। भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) गेल्या आठवड्यात महत्त्वाचा निर्णय घेत रेपो रेटमध्ये 0.5 टक्क्यांची कपात केली. त्यामुळे सध्या रेपो रेट 5.5 टक्के आहे. यासोबतच रोख राखीव प्रमाण (CRR) मध्येही 1 टक्क्यांची कपात करण्यात आली.
यानंतर आता देशातील अनेक बँकांनी त्यांच्या कर्जावरील व्याजदरात कपात करण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे होम लोन, कार लोन, पर्सनल लोन आणि एमएसएमई लोन घेणाऱ्या ग्राहकांना थेट फायदा होणार आहे.
सरकारी बँकांकडून दिलासा
युनियन बँक ऑफ इंडिया, केनरा बँक आणि इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) या तीन सरकारी बँकांनी त्यांच्या कर्जावरील व्याजदरात 0.50 टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. या निर्णयामुळे कर्ज घेणे आता थोडे स्वस्त होणार असून सामान्य ग्राहकांचा हप्ता कमी होईल.
युनियन बँक ऑफ इंडिया
युनियन बँक ऑफ इंडियाने EBLR आणि RLLR दरात 0.50% ची कपात केली आहे. बँकेने स्पष्ट सांगितलं की, RBI ने रेपो रेट कमी केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. आता युनियन बँकेच्या ग्राहकांना कमी व्याजदरावर कर्ज मिळणार आहे.
IOB नेही घटवले दर
इंडियन ओव्हरसीज बँकेने (IOB) देखील कर्जाच्या व्याजदरात 0.50 टक्के कपात केली असून, त्यांचा RLLR (Repo Linked Lending Rate) दर 8.85% वरून 8.35% झाला आहे. बँकेच्या ALCO (Asset Liability Committee) बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
केनरा बँकेकडूनही दिलासा
केनरा बँकेने देखील RLLR दरात 0.50% कपात केली असून, ती आता 8.75% वरून 8.25% झाली आहे. हा नवीन व्याजदर बुधवारपासून लागू होणार आहेत.
यापूर्वी बँक ऑफ बडोदाने त्यांच्या RLLR मध्ये 0.50% कपात केली होती. एचडीएफसी बँकेने त्यांच्या MCLR दरात 0.10% पर्यंत कपात केली आहे, ज्याचा फायदा त्यांच्याकडून MCLR आधारित कर्ज घेतलेल्या ग्राहकांना होणार आहे.
विशेषज्ञांच्या मते, बँकांकडून कर्जावरील दरात झालेल्या या कपातीमुळे होम लोन, कार लोन, पर्सनल लोन घेणाऱ्या ग्राहकांना आणि लघुउद्योगांना (MSME) मोठा दिलासा मिळेल. मासिक हप्ते कमी होतील आणि नव्याने कर्ज घेणाऱ्यांनाही फायदा होईल. RBI ने दर कपात केल्यामुळे आर्थिक चक्राला चालना मिळेल आणि सामान्य माणसाच्या खिशावरचा भार कमी होईल.