महाराष्ट्र 24 : ऑनलाईन : विशेष प्रतिनिधी :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या चषकावर दक्षिण आफ्रिकेनं नाव कोरलं आहे. दक्षिण आफ्रिकेनं एडन मार्करम आणि टेम्बा बावुमाने केलेल्या भागिदारीच्या जोरावर नवा इतिहास घडवला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांच्या दमदार कामगिरीनंतर फलंदाजांनी केलेल्या संयमी खेळीमुळं ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला पराभूत करणं शक्य झालं. दक्षिण आफ्रिकेच्या रुपानं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला तिसरा विजेता मिळाला आहे.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचं पहिलं विजेतेपद न्यूझीलंडनं मिळवलं होतं. त्यानंतर दुसऱ्या स्पर्धेत ऑस्ट्रेलियानं विजेतेपद मिळवलं होतं. आता तिसऱ्या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेनं ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं आहे. पहिल्या दोन वेळा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताचा पराभव झाला होता.
रबाडा, लुंगी एन्गिडी, टेंबा बावुमा, एडन मार्करम ठरले विजयाचे शिल्पकार
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडानं पहिल्या डावात 5 विकेट घेतल्या तर दुसऱ्या डावात चार विकेट घेतल्या. मार्को जॅन्सननं पहिल्या डावात तीन विकेट घेतल्या होत्या. लुंगी एन्गिडीनं ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात महत्त्वाच्या तीन विकेट घेतल्या.
ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात 138 धावांवर बाद करत मॅच वर पकड मिळवली होती. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियानं 212 धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात मिशेल स्टार्कच्या अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं 207 धावांपर्यंत मजल मारली होती. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 282 धावा करायच्या होत्या. एडन मार्करमनं 136 धावा तर टेंबा बावुमानं 66 धावांची खेळी करत दक्षिण आफ्रिकेला विजयाच्या मार्गावर नेलं.एडन मार्करम आणि टेम्बा बावुमा या दोघांनी केलेली 147 धावांची भागिदारी महत्त्वाची ठरली. दक्षिण आफ्रिकेनं तब्बल 27 वर्षानंतर आयसीसी ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. दक्षिण आफ्रिकेनं 1998 मध्ये तत्कालीन नॉक आऊट ट्रॉफी म्हणजेच चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. त्यानंतर दक्षिण अफ्रिकेनं अखेर 27 वर्षानंतर आयसीसी ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.
तीन समीकरणांचा शेवट
ऑस्ट्रेलियाला 2010 नंतर पहिल्यांदा आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभव स्वीकारावा लागला आहे. ऑस्ट्रेलियाच्या तीन खेळाडूंसदर्भातील तीन समीकरणांची अनेकदा चर्चा व्हायची. जोश हेझलवूड यानं त्याच्या करिअरमध्ये खेळलेल्या फायनलमध्ये एकाही फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला नव्हता. मिशेल स्टार्कनं त्याच्या करिअरमध्ये एकदाही फायनलमध्ये पराभव स्वीकारला नव्हता. तर, पॅट कमिन्सनं नेतृत्त्व केलेल्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा कधीच पराभव झाला नव्हता. आता, मात्र या तीन समीकरणांचा शेवट दक्षिण आफ्रिकेच्या विजयानं झाला आहे. एडन मार्करमच्या शतकी खेळीमुळं दक्षिण आफ्रिकेनं ऑस्ट्रेलियाला सहज पराभूत केलं.
