Pune Bridge Collapse : ना स्थानिक नागरिक, ना पर्यटक….शोधकार्य थांबले ; कुंडमळ्यात आता केवळ सामसूम

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ जून ।। पाऊस सुरू झाला की नेहमी पर्यटकांच्या गर्दीने फुलणाऱ्या कुंडमळा परिसरात रविवारच्या घटनेनंतर सामसूम होती. पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर सुरू असणारे शोधकार्य सोमवारी थांबविण्यात आले होते. पोलिस, ‘एनडीआरएफ,’ सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते माघारी फिरले असून, सध्या या ठिकाणी ना स्थानिक नागरिक, ना पर्यटक अशी परस्थिती आहे.

इंद्रायणी नदीच्या पात्रात शेलारवाडी आणि कुंडमळा या दोन गावांना जोडणारा जुना पूल होता. अर्धा पूल काँक्रिटचा आणि अर्धा पूल लोखंडी ढाच्याचा होता. पादचाऱ्यांसाठी हा पूल बनविण्यात आला होता. मात्र, स्थानिक नागरिक दुचाकीसाठी पुलाचा वापर करीत होते. ग्रामपंचायत प्रशासनाने हा पूल वाहनांसाठी धोकादायक असल्याचे याचा वापर करू नये, अशा सूचना दिल्या होत्या. मात्र, स्थानिक, पर्यटक या सर्वांनीच या सूचनेकडे दुर्लक्ष केले. पावसाळ्यात या ठिकाणी पर्यटक दररोज गर्दी करतात. शनिवारी आणि रविवारी तर उभे राहायला जागा नसते. रविवारीही अशीच गर्दी झाल्याने पूल कोसळून अनेक जण पाण्यात वाहून गेले.

शेवाळलेले खडक
इंद्रायणी नदीपात्रात असलेल्या कुंडमळा या ठिकाणी पात्रातील खडक पूर्णपणे शेवाळलेले आहेत; तसेच नदीपात्राच्या कडेचे रस्ते निसरडे झाले आहेत. पर्यटक या धोकादायक रस्त्यांवरून पळतात, फोटो काढतात, नाच-गाणे करून रील करतात. रविवारीही असाच पर्यटकांचा अतिउत्साह अंगलट आला आहे. पुलावर शेकडो पर्यटक एकदम चढले. काही पर्यटक दुचाकी घेऊन पुलावर चढले होते. क्षमतेपेक्षा जास्त वजन झाल्याने पूल कोसळून दुर्घटना घडली.
pune kundamala bridge collapse

पर्यटक – स्थानिकांत वाद
कुंडमळा येथे मोठ्या संख्येने पर्यटक येतात. स्थानिक नागरिक या पर्यटकांना पाण्यात उतरू नका, पुलावर दुचाकी घालू नका, अशा सूचना देतात. मात्र, पर्यटक स्थानिकांबरोबर भांडण करतात. पोलिसांच्याही सूचनेकडे दुर्लक्ष करतात. रविवारी स्थानिक नागरिक पर्यटकांना पुलावर जाण्यापासून रोखत होते. त्या वेळीही पर्यटकांनी स्थानिक नागरिकांबरोबर वाद घातला होता, असे एका प्रत्यक्षदर्शी स्थानिक नागरिकाने सांगितले.

सुरक्षेततेची जबाबदारी कोणाची?
कुंडमळा हे ठिकाण इंदोरी ग्रामपंचायत हद्दीत येते. अपघातात पडलेला पूलही या ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतो. पोलिस प्रशासनाचा विचार केला, तर कुंडमळा चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीत येते. हे पर्यटनस्थळ असून, या ठिकाणच्या विकासाची जबाबदारी पुणे जिल्हा परिषद आणि राज्य सरकारची आहे. रस्ते, पूल बांधण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्याची आहे.

ग्रामपंचायत, पोलिस, जिल्हा परिषद, राज्य सरकार आणि सार्वजनिक बांधकाम विभाग एवढे सर्व विभाग असताना येथे कोणत्याही प्रकारची सुरक्षा नव्हती. पर्यटकांना सूचना देण्यासाठी पोलिस किंवा सुरक्षारक्षक नव्हते. त्यामुळे या ठिकाणच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *