महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ जून ।। सर्वांचे लक्ष वेधून घेणार्या माऊली ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे प्रस्थान अवघ्या तीन दिवसांवर आले असून, हाडाच्या वारकर्यांना वारीचे वेध लागले आहेत. पाऊसही वेळेपूर्वीच कमी-अधिक प्रमाणात झाल्याने पेरण्या झाल्या. त्यामुळे ‘जय हरी माऊली म्हणा आता चला वारीला’ अशी चर्चा होत आहे. भाविकांना आता पंढरीवारीचे वेध लागले आहेत.
संत ज्ञानोबा, तुकोबाचा पालखी सोहळा म्हणजे वारकर्यांसाठी महापर्वणी असते. आषाढी एकादशीला आपल्या लाडक्या विठूरायाच्या दर्शनाला संतांसमवेत जाण्याचा आनंद हा काही औरच असतो. मात्र, ‘वार्या हाती माप चाले सज्जनांचे’ याप्रमाणे प्रस्थान सोहळ्याचे वेळापत्रक संस्थानकडून जाहीर होताच वारकरी तयारीला लागतात. पेरण्या करून अथवा वेळप्रसंगी दुसर्यावर पेरणीची जबाबदारी सोपवून वारी चुकू देत नाही. (Latest Ahilyanagar News)
अशाच प्रकारे यंदा नेवासा येथील संत ज्ञानेश्वर मंदिर या ठिकाणाहून तालुक्यातील जवळपास 25 ते 30 दिंड्या एकत्र संस्थानचे अध्यक्ष माजी आ. पांडुरंग अभंग व वेदांताचार्य देविदास महाराज म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरीच्या वारीला निघणार आहे. या माऊली दिंडीचे प्रस्थान गुरुवारी (दि. 19) जूनला होणार आहे. पहिला मुक्काम नेवाशात असून, रिंगण सोहळाही मोठ्या उत्साहात बसस्थानक आवारात होणार आहे.
शहरातील यंदा माऊलींची दिंडी सोहळ्यानिमित्त राज्यातील पहिला रिंगण सोहळा नेवासेकरांना पाहण्यास मिळणार आहे. हा नेवाशातील पालखी सोहळा भाविकांना घेत ऊन, वारा व पावसाची पर्वा न करता पंढरीकडे निघणार आहे.
देवगड दिंडी कोरोनापासून बंदच!
राज्यातील सर्वांत शिस्तबद्ध आणि सुंदर दिंडी असलेली दत्त देवगडची दिंडी कोरोना काळापासून बंदच आहे. मात्र, 3 ते 6 जुलैदरम्यान पारायण सोहळा व विविध धार्मिक कार्यक्रम देवगडला होणार आहेत.