![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० जून ।। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याने आज पुण्यनगरीकडे प्रस्थान ठेवलं. आळंदीतील संजीवन समाधी मंदिराजवळील माऊलींच्या आजुळ घरी झालेल्या पारंपरिक मुक्कामानंतर अभंगवाणीत रंगलेल्या वातावरणात माऊलींच्या पालखीने पुण्यनगरीकडे प्रस्थान ठेवलंय. पुण्यनगरी विठुरायाच्या जयघोषाने दुमदुमली. वारकऱ्यांची गर्दी देखील वाढत चालली आहे.
पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माऊलींच्या पालखीचे दर्शन घेणार आहेत. पुण्यातील विठोबा मंदिरात रात्री १० वाजता मुख्यमंत्री माऊलींच्या पालखीचे दर्शन घेणार आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज पुण्यात मुक्कामी असल्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस हे रात्री उशिरा पुण्यात दाखल होणार आहेत. संत तुकाराम महाराज पालखीचे मुख्यमंत्री यांनी देहूमध्ये घेतलं होतं. आता ते ज्ञानोबांच्या पालखीचे देखील दर्शन घेण्यासाठी पुण्यात येणार आहेत.
तर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज पहाटे आकुर्डी येथून पुण्याच्या दिशेने प्रस्थान झाला आहे. आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आरती झाल्यानंतर पहाटेच्या मंद प्रकाशात हा वैष्णवांचा मेळा ग्यानबा – तुकारामाच्या जयघोषात पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे. तुकाराम महाराजांची पालखी दापोडी येथे दुपारचा विसावा घेणार आहे. त्यानंतर पुणे शहरातील संगमवाडी येथे संत तुकाराम महाराज आणि कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचं संगम होणार आहे. पालखी संगम झाल्यानंतर तुकाराम महाराजांची पालखी आणि ज्ञानेश्वर माऊलीची पालखी पुण्यात दोन दिवसाच्या मुक्कामाला थांबणार आहे.
‘पंढरपूरची वाट धरू या… माऊलीच्या पालखीशी चालू या… ‘ संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीने काल रात्री आळंदीहून प्रस्थान ठेवलं. पालखीचा पहिला मुक्काम माऊलींच्या ‘आजुळ घरात’ म्हणजेच संजीवन समाधी मंदिराजवळील गांधी वाडा येथे झाला. आज सकाळी सहा वाजता पालखी पुण्यनगरीच्या दिशेने मार्गस्थ झाली. “ज्ञानोबा माऊली तुकाराम… पंढरीनाथा रखुमादेवी…”, या अभंगवाणीत हरिपाठाच्या गजरात वारकऱ्यांनी आज प्रस्थानावेळी भक्तीत तल्लीन झाले होते.
यावेळी संजीवन समाधी मंदिरात झालेल्या प्रस्थान सोहळ्याला मानाच्या दिंड्यांनी हजेरी लावली असून, मृदुंग-टाळांच्या नादात आणि भक्तिरसात न्हालेल्या वातावरणात वारकरी तल्लीन झालेत. माऊलींच्या आषाढी वारीचा मुख्य टप्पा सुरू झाला असून, लाखो भाविक माऊलींच्या पालखीच्या मागोमाग ‘ज्ञानोबाचा गजर’ करत पंढरपूरच्या दिशेने पायदंडी यात्रा सुरू करणार आहेत.
