महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० जून ।। राज्यात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्राला पाऊस अक्षरश: झोडपून काढत आहे. गुरूवारी राज्यात मान्सूच्या सुरूवातीच्या टप्प्यातील आतापर्यंतचा चांगला पाऊस पडल्याचे सांगितले जात आहे. सर्वाधिक पाऊस कोकणात झाला. राज्यासाठी आजचा दिवस देखील खूपच महत्वाचा आहे.
आज देखील राज्यात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील जिल्हे, पुणे, सातारा आणि कोल्हापूरला आज पाऊस झोडपून काढणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिक आणि शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी आणि सतर्क राहवे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज पुणे जिल्ह्यातल्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे. पुण्याला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिकमधील घाटमाथा, साताऱ्यातील घाटमाथा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
तसंच आज मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या सर्व जिल्ह्यांना हवामान खात्याकडून पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे.