Ashadhi Wari : संत ज्ञानेश्वर महाराज अन् संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा आज पुण्यात संगम

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० जून ।। संत ज्ञानेश्वर महाराज (Sant Dnyaneshwar Maharaj) आणि संत तुकाराम महाराजांच्या (Sant Tukaram Maharaj) पालखीचा आज पुण्यात संगम होतो. संगमवाडी पुलाजवळ दोन्ही पालख्यांचं मनोमिलन होतं. तिथून पुण्यात स्वतंत्र ठिकाणी दोन्ही पालख्या विसावतात आणि रविवारी हडपसर मधून या पालख्या वेगवेगळ्या मार्गाने पंढरपूरकडे मार्गस्थ होतील. त्यानंतर या पालख्या वाखरी गावात एकत्र येतात. त्यामुळं आजचा दिवस या दोन्ही पालख्या आणि वारकाऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचा मानला जातो.

संत तुकाराम महाराज पालखी
आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरातून पहाटे 6 वाजता पुण्याकडे मार्गस्थ झाली. नाना पेठेतील निवडुंगा विठ्ठल मंदिरात दोन दिवस मुक्कामी असेल.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी
आळंदीतील गांधी वाड्यातून पहाटे 6 वाजता पुण्याकडे मार्गस्थ झाली. भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात दोन दिवसांसाठी मुक्कामी असेल.

वारकऱ्यांनी धरला फेर, फुगड्या आणि नामघोष
आळंदीत भगव्या पताका, टाळ-मृदुंगाचा निनाद आणि ‘ज्ञानोबा-तुकारामांचा जयघोष सुरू आहे. पालखीसमवेत जाण्यासाठी वारकरी दाखल झाल्याने अलंकापुरी वारकऱ्यांनी गजबजून निघाली आहे. फेर, फुगड्या, नामघोष करून वारकरी प्रस्थानापूर्वीचा मनसोक्त आनंद लुटत होते.

पावसाच्या सरींमध्ये हरिनामाचा गजर
टाळ-मृदंगाच्या गजरात, “ज्ञानोबा-तुकाराम” असा हरिनामाचा जयघोष करत श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली असून, काल पालखी सोहळा पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या उत्साहात दाखल झाला. निगडी येथील भक्ती-शक्ती चौक ते आकुर्डी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर दरम्यान पालखी मार्गावर वारकऱ्यांचा उत्साह आणि भक्तिभाव शिगेला पोहोचलेला दिसून आला.

आयुक्त शेखर सिंह यांचा अभंगावर ठेका
पारंपरिक वेशभूषेत उपस्थित राहून आयुक्त शेखर सिंह यांनी अभंगावर ठेका धरून आपल्या भक्तिभावाने उपस्थितांची मने जिंकली. यावेळी जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठाचे शिक्षक व विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अभंग गायन कार्यक्रमाने वातावरण भारावून गेले. पालखी सोहळ्यासोबत पिण्याच्या पाण्याचे टँकर, रुग्णवाहिका व अग्निशमन वाहनांचीही योग्य ती व्यवस्था करण्यात आली होती.

पावसातही उत्साह ओसंडून वाहतोय
भरपावसातही वारकऱ्यांचा उत्साह काहीसा मंदावलेला नाही. सोहळा सायंकाळी आकुर्डी येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मुक्कामी विसावला असून, येथून पुढे पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे.

आळंदीतही भाविकांची गर्दी
दुसरीकडे, आळंदी येथे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउलींच्या समाधीच्या दर्शनासाठी पावसातही भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे. दिवसभर पडणाऱ्या जोरदार पावसातही वारकऱ्यांनी उभे राहून दर्शन घेतले. पास नसलेल्या भाविकांना महाद्वारातून प्रवेश नाकारण्यात आला, दर्शनासाठी विशेष रांगा लावण्यात आल्या.वारकऱ्यांचा अखंड हरिनामाचा गजर, भक्तिभाव, आषाढी वारीचं पावित्र्यपूर्ण वातावरण, या सर्व गोष्टींनी परिसर धार्मिकतेने भारलेला पाहायला मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *