महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २२ जून ।। आषाढी वारीच्या पालखी सोहळ्यामुळे शुक्रवारी (ता. २०) रस्ते वाहतूक आणि पीएमपीएलच्या बसगाड्या बंद असल्यामुळे नागरिकांनी मेट्रोने प्रवास केला. पिंपरी ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी मार्गावर तीन लाख १९ हजार ६६ प्रवाशांनी प्रवास केला. मात्र, अचानक वाढलेल्या प्रवाशांमुळे नियोजन करताना मेट्रो प्रशासनाची दमछाक झाली.
पुणे शहरात शुक्रवारी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू तुकाराम महाराज पालखीचे आगमन झाले. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील महत्त्वाचे मार्ग बंद करण्यात आले होते. जुना पुणे-मुंबई महामार्ग बंद असल्यामुळे पुण्यात जाण्यासाठी पुणे-बंगळूर महामार्गाचा वापर करावा लागला. पीएमपीच्या अनेक मार्गावरील बस बंद होत्या. रस्ते वाहतूक बंद असल्यामुळे मेट्रोला गर्दी वाढली. पिंपरी ते स्वारगेट (पर्पल मार्गिका) मार्गावर १ लाख ५० हजार ३८५, तर वनाज ते रामवाडी (ॲक्वा मार्गिका) मार्गावर १ लाख ६८ हजार ६८१ प्रवाशांनी प्रवास केला. यातून मेट्रो प्रशासनाला ५३ लाख १४ हजार ५२९ रुपये उत्पन्न मिळाले आहे. मात्र, गुरुवारी केवळ १ लाख ५२ हजार ४८४ प्रवाशांनी प्रवास केला होता.
ग्रामीण भागातून आलेल्या प्रवाशांनी शुक्रवारी मेट्रोने प्रवास केला. नागरिकांव्यतिरिक्त काही वारकऱ्यांनी देखील मेट्रोने प्रवास केला. त्यामुळे शुक्रवारी मेट्रोला मोठी गर्दी होती. पिंपरीसह विविध मेट्रो स्थानकांवर दिवसभर तिकिटासाठी प्रवाशांच्या लांब रांगा लागल्या होत्या. मेट्रो स्टेशनवर प्रवाशांना प्रवेश आणि बाहेर पडण्यापूर्वी तिकीट स्कॅन करावे लागते. गर्दी वाढल्यामुळे अनेक स्टेशनवर बाहेर पडण्यासाठी प्रवाशांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना बाहेर पडण्यासाठी बराच वेळ लागत होता.
मेट्रोमध्ये सेल्फी
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद््गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान झाल्यामुळे सर्वत्र भक्तिमय वातावरण झाले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील विविध मार्गांवर दिड्यांमधील वारकरी दाखल झाले होते, तसेच शहरातील नागरिकही वारकऱ्यांच्या वेशात दाखल झाले होते. मेट्रोतही शुक्रवारी अनेक नागरिक वारकरी वेशात होते. अनेक जण मेट्रोत वारकरी वेशात सेल्फी काढताना दिसून आले.
मेट्रो प्रवासी संख्या
पिंपरी ते स्वारगेट – १,५०,३८५
वनाज ते रामवाडी – १,६८,६८१
एकूण – ३,१९,०६६