महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २२ जून ।। अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणने पुन्हा इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला करून प्रत्युत्तर दिले. तेल अवीवसह अनेक भागात इराणने ३० क्षेपणास्त्र डागली. इराणकडून करण्यात आलेल्या हल्ल्यांनंतर इस्त्राईलच्या विविध भागांत सतर्कतेचे सायरन वाजवण्यात आल्याची माहिती इस्रायलच्या संरक्षण दलाने (IDF) दिली.
आयडीएफच्या प्रवक्त्याने इस्रायलच्या नागरिकांना होम फ्रंट कमांडच्या निर्देशांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. सध्या इस्त्रायलचे हवाई दल संभाव्य धोके रोखण्यासाठी आणि देशाच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती कारवाई करत आहे. इराणने इस्रायलच्या दिशेने क्षेपणास्त्रे डागली असल्याचे इस्रायली लष्कराने म्हटले आहे. तेल अवीव आणि मध्य इस्रायलवर अनेक स्फोट झाल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे. लष्कराने सांगितले की, क्षेपणास्त्रांचा मारा इस्रायलच्या दिशेने करण्यात आला आहे. इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर देशाच्या विविध भागांमध्ये अनेक ठिकाणी नुकसान झाल्याचे इस्रायली माध्यमांनी म्हटले आहे.
दरम्यान, इस्रायलच्या विमानतळ प्राधिकरणाने देशाची हवाई हद्द सर्व उड्डाणांसाठी बंद केली आहे. इजिप्त व जॉर्डनसोबतच्या जमिनीवरील सीमा फक्त खुल्या आहेत. एल अल आणि आर्किया एअरलाइन्सने पुढील सूचना मिळेपर्यंत इस्रायलमधील उड्डाणे स्थगित करत असल्याचे म्हटले आहे. एल अल इस्रायल एअरलाइन्सने आता २७ जूनपर्यंत आपली नियोजित उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची आपत्कालीन बैठक बोलावण्याची इराणची मागणी
अमेरिकेच्या हल्ल्यांबद्दल इराणने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची आपत्कालीन बैठक बोलावण्याची मागणी केली आहे. इराणच्या संयुक्त राष्ट्रातील राजदूतांनी अमेरिकेचे इराणविरुद्धचे घृणास्पद हल्ले आणि बेकायदेशीर बळाचा वापर, असे वर्णन केले आहे. तसेच सुरक्षा परिषदेची आपत्कालीन बैठक बोलावण्याची मागणी केली आहे.