महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २४ जून ।। सत्ताधारी आणि विरोधकांकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी केली जात आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर राज्यात निवडणुकीचे पडघम वाजयाला सुरूवात झाली. महानगर पालिकेच्या प्रभाग रचनेचे सरकारकडून आदेश जारी करण्यात आले होते. त्यामुळे दिवाळीच्या आधी निवडणुका होतील, असा अंदाज बांधला जात होता. पण आता समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे अन् पुण्यासारख्या मनपा निवडणुका ऑक्टोबरमध्ये होणार नाहीत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतरच होतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.
मुंबई, पुण्यासह राज्यातील इतर महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका ऑक्टोबरनंतर म्हणजेच दिवाळीनंतर होणार, हे आता जवळपास निश्चित झालं आहे. निवडणुकीसंदर्भातील शासकीय हालचाली गतीमान झाल्या आहेत. मनपा निवडणुकीसाठी तयार करण्यात येत असलेल्या प्रभाग रचनेच्या कालमर्यादेला प्रशासनाकडून वाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या निवडणुका आणखी पुढे जातील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर राज्यात ऑक्टोबरपर्यंत निवडणुका होतील, असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त करण्यात येत होता. त्यात सोमवारी नगरविकास विभागाने प्रभाग रचनेच्या वेळापत्रकात सुधारणा करत, अहवाल सादरीकरणासाठीची मुदत वाढवली. प्रभाग रचना जाहीर केल्यानंतर त्याचे प्रारुप जाहीर करणे, त्यावरील हरकती, आक्षेप नोंदवण्याची प्रक्रिया होईल. त्यानंतर या हरकती, सूचनांवर सुनावणी पार पडणार आहे. त्यानंतरच प्रभाग रचनेच्या अंतिम मंजुरीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे, त्यामुळे निवडणुकाही दोन ते तीन महिन्यांनी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. नोव्हेंबर अथवा डिसेंबर यादरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील.
नगरविकास विभागाच्या नव्या आदेशानुसार, आता ६ ऑक्टोबरपर्यंत मुंबई महानगरपालिका प्रभाग रचना अहवाल सादर करता येणार आहे. तर ड वर्गातील महापालिकेचा अहवाल १३ ऑक्टोबरपर्यंत सादर करता येईल. नगर परिषद व नगरपंचायतीसाठी ३० सप्टेंबर अशी मुदत आहे.