महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २४ जून ।। मागील दोन- तीन दिवसांपासून उजनी धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस होत असल्याने उजनी धरणातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळे धरणातून भीमा नदीत सोडण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे पंढरपुरात चंद्रभागेच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे आज चंद्रभागा वाळवंटातील भक्त पुंडलिकासह अनेक मंदिरे पाण्याखाली गेली आहेत.
पंढरपूरची आषाढी यात्रा ६ जुलैला आहे. या अनुषंगाने विठ्ठल- रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. तर पुढील काही दिवसात भाविकांची गर्दी अधिक होणार असून काही दिवसांनी पायी वारी करणारे वारकरी देखील पंढरपुरात दाखल होतील. मात्र आषाढीच्या तोंडावर चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. पाऊस असाच सुरु राहिल्यास चंद्रभागेला पूर राहण्याची शक्यता आहे.
मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग
उजनी धरणातून सध्या ४० हजार तर वीर धरणातून १५ हजार क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे. दरम्यान आज सायंकाळपर्यंत पंढरपुरात पूरस्थिती निर्माण होऊ शकते. सध्या पंढरपुरात चंद्रभागा नदी २५ हजार पेक्षा अधिक क्युसेकने वाहत आहे. पूरस्थिती गंभीर झाल्यास चंद्रभागा नदीत स्नान करण्यास भाविकांना मनाई करण्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान नदीकाठी रेस्क्यू टीम तैनात करण्यात आल्या आहेत.
कायमस्वरूपी मासं विक्री बंदीसाठी आंदोलन
महाराष्ट्रातील एक महत्वाचे तीर्थक्षेत्र पंढरपूर आहे. या पंढरपूर तीर्थक्षेत्री आषाढी वारीसाठी दहा दिवस मांस विक्री बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र पंढरपुरात केवळ १० दिवस नव्हे; तर कायम स्वरुपी मांस व मद्य विक्री बंद व्हावी; अशी मागणी आता बजरंग दल यांच्या माध्यमातून होत आहे. कायम स्वरुपी मांस व मद्य विक्री बंद व्हावी. यासाठी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांच्या माध्यमातून आज निदर्शने करण्यात आली आहे.