महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २४ जून ।। इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध संपल्याची घोषणा करण्यात आली आहे. इस्त्रायल आणि इराण यांच्यात पूर्ण आणि अंतिम शस्त्रसंधीसाठी एकमत झाल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. यासह मागील 12 दिवसांपासून सुरु असलेलं युद्ध अखेर संपलं आहे. दोन्ही देश मध्य पूर्वेत शांतता स्थापित करण्यासाठी तयार झाले आहेत. इराणने आपली शपथ पूर्ण करण्याच्या हेतूने कतारमधील एअरबेसवर हल्ला केल्यानंतर ही माहिती समोर आली आहे.
शस्त्रसंधीची घोषणा होण्याआधी इराणने 6 मिसाईल्स कतारच्या दिशेने डागली, ज्यांनी अमेरिकन लष्कराच्या तळाला लक्ष्य केलं. तथापि, युद्धबंदीवर अजूनही संशयाचे ढग आहेत. कारण इराणने अद्याप युद्धबंदी झाल्याचं मान्य केलेले नाही. इराण असंही म्हणत आहे की त्यांच्याकडे कोणतीही माहिती नाही. त्याचवेळी, इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांनी इराण कधीही शरणागती पत्करणार नाही असं म्हटलं आहे. दुसरीकडे, मंगळवारीही तेहरानमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रूथ पोस्टवर पोस्ट केलं आहे की, “अभिनंदन! इराण आणि इस्त्रायलमध्ये पूर्ण आणि अंतिम युद्धबंदीसाठी एकमत झालं आहे. सहा तासांच्या आत युद्धबंदी सुरु होईल आणि इराणला आधी त्याचं पालन करावं लागेल. इराणकडून युद्धबंदीचं पालन केल्यानंतर पुढील 12 तासांनंतर इस्त्रालयलही युद्धबंदीत सहभागी होईल. 24 तासांनंतर औपचारिकपणे युद्ध संपलं असं मानलं जाईल”.
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि इस्रायलच्या सहनशक्ती, धाडस आणि बुद्धिमत्तेचं कौतुक केले आहे. दोन्ही देशांमधील हे युद्ध वर्षानुवर्षे सुरु राहू शकलं असतं, ज्यामुळे मध्य पूर्व नष्ट होऊ शकले असते. पण असे झाले नाही आणि कधीही होणार नाही असंही ते म्हणाले आहेत.
पुढे त्यांनी म्हटलं आहे की, देवाने इराण, इस्रायल आणि मध्य पूर्वे, अमेरिकेसह संपूर्ण जगावर आपली कृपा ठेवावी अमेरिकेने इराणच्या अणुकेंद्रांना नष्ट केलं. एकही अमेरिकन नागरिक मृत्युमुखी न पडणं आणि आपण एका दीर्घ युद्धातून वाचलो, हा माझ्यासाठी एक मोठा विजय आहे. माझे वडील कधीही अमेरिकेला एका दीर्घ युद्धात ओढू इच्छित नव्हते. जे त्यांना ओळखतात त्यांना माहिती आहे की त्यांना नेहमीच शांतता हवी असते. त्यांचे अंतिम ध्येय शांतता होती. अमेरिका फर्स्ट!
रात्री उशिरा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पोस्ट करून सांगितलं होतं की, इराणच्या अणुकेंद्रांवर आम्ही केलेल्या हल्ल्याला तेहरानने खूपच कमकुवत प्रतिसाद दिला. आम्हाला हे अपेक्षित होते. 14 क्षेपणास्त्रं डागण्यात आली, 13 पाडण्यात आली आणि एक आम्ही जाऊ दिला कारण तो धोकादायक दिशेने जात नव्हता. अमेरिकेच्या कोणत्याही नागरिकाला इजा झालेली नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्यांनी ते त्यांच्या यंत्रणेतून बाहेर काढले आहे आणि आशा आहे की पुढे द्वेष निर्माण होणार नाही. आम्हाला आगाऊ माहिती दिल्याबद्दल मी इराणचे आभार मानू इच्छितो, त्यामुळे कोणीही मारले गेले नाही आणि कोणीही जखमी झाले नाही. कदाचित इराण आता या प्रदेशात शांतता आणि सौहार्दाकडे वाटचाल करू शकेल आणि मी उत्साहाने इस्रायलला असे करण्यास प्रोत्साहित करेन.