महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ जून ।। पहिल्या अँडरसन-तेंडुलकर कसोटी सामन्यात इंग्लंडने भारतावर 5 गड्यांनी मात करत पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. हेडिंग्ले मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी शेवटपर्यंत झुंज दिली, मात्र इंग्लिश फलंदाजांनी संयम राखत विजय खेचून नेला. भारताने दुसऱ्या डावात ऋषभ पंत आणि के.एल. राहुलच्या शानदार शतकांच्या जोरावर इंग्लंडपुढे 371 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र इंग्लंडच्या बेन डकेट, जॅक क्रॉली आणि जो रूट यांच्या संयमी खेळीने यजमानांनी हे आव्हान पाच गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं.
पाच शतके तरी टीम इंडियाचा पराभव!
हा भारतीय संघाच्या खूपच जिव्हारी लागला, कारण या सामन्यात भारतीय फलंदाजांनी झंझावाती कामगिरी केली होती. भारताच्या डावात एकूण पाच शतके झळकली, ऋषभ पंतने दोन्ही डावांत शतक ठोकून ऐतिहासिक कामगिरी केली. त्याचबरोबर यशस्वी जैस्वाल, कर्णधार शुभमन गिल आणि के एल राहुल यांनीही दमदार शतके ठोकली. पण या फलंदाजीच्या झगमगाटाला भारतीय गोलंदाज साथ देऊ शकले नाहीत.
पहिल्या डावात जसप्रीत बुमराहने 5 बळी घेत इंग्लंडला अडचणीत आणले, पण दुसऱ्या डावात तो अपयशी ठरला. प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूर यांनीही अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही. निर्णायक दिवशी भारताला विजयासाठी झटणं अपेक्षित होतं, पण खराब गोलंदाजीमुळे इंग्लंडने सहज लक्ष्य गाठलं. या विजयानंतर पाच सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने 1-0 ने आघाडी घेतली आहे.
इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यात भारताने नाणेफेक गमावली असली तरी पहिल्या डावात दमदार कामगिरी केली. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत 471 धावा केल्या. कर्णधार शुभमन गिलने जबरदस्त नेतृत्व करत 227 चेंडूंमध्ये 147 धावांची शानदार खेळी साकारली. या खेळीत त्याने 19 चौकार आणि एक षटकार लगावला.
उपकर्णधार आणि यष्टिरक्षक ऋषभ पंतने देखील आक्रमक शैलीत 178 चेंडूंवर 134 धावांची खेळी खेळली. पंतच्या खेळीत 12 चौकार आणि 6 गगनचुंबी षटकारांचा समावेश होता. सलामीवीर यशस्वी जैस्वालनेही आपली छाप पाडत 159 चेंडूंमध्ये 101 धावांची खेळी केली, ज्यामध्ये 16 चौकार आणि एक षटकार होता. इंग्लंडकडून जोश टंग आणि कर्णधार बेन स्टोक्स यांनी प्रत्येकी 4 गडी बाद केले.
भारतानंतर फलंदाजीला आलेल्या इंग्लंड संघाची पहिली डाव 465 धावांवर आटोपली. इंग्लंडकडून ओली पोपने सर्वाधिक 106 धावा करत चमकदार कामगिरी केली. हॅरी ब्रूक 99 धावांवर आऊट झाला. त्याने 112 चेंडूंमध्ये 11 चौकार आणि 2 षटकार लगावले. सलामीवीर बेन डकेटनेही 94 चेंडूंमध्ये 9 चौकारांसह 62 धावांची अर्धशतकी खेळी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. भारताची शान जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 5 गडी बाद करत इंग्लंडला अडचणीत टाकलं. प्रसिद्ध कृष्णाने 3 तर मोहम्मद सिराजने 2 विकेट्स घेतल्या.
भारताच्या दुसऱ्या डावातही ऋषभ पंतने आक्रमक शतक झळकावत आपली शानदार फॉर्म कायम ठेवली. पंतने फक्त 140 चेंडूंमध्ये 15 चौकार आणि 3 षटकारांच्या जोरावर 118 धावा ठोकल्या. सलामीवीर केएल राहुलनेही संयमी आणि क्लासिक खेळी करत 247 चेंडूंमध्ये 137 धावांची महत्त्वपूर्ण शतकी खेळी साकारली. त्याच्या खेळीत 18 चौकारांचा समावेश होता. मात्र या दोघांच्या बाद झाल्यानंतर भारतीय डावाची अचानक घसरण झाली आणि केवळ 31 धावांत शेवटचे सहा फलंदाज माघारी परतले.
पहिल्या डावात 6 धावांची आघाडी मिळाल्याने टीम इंडियाने दुसऱ्या डावात 364 धावा केल्या आहेत, त्यामुळे इंग्लंडला 371 धावांचे लक्ष्य ठेवले. इंग्लंडकडून ब्रायडन कार्स आणि जोश टंग यांनी प्रत्येकी 3 गडी बाद करत भारताला झटका दिला.
इंग्लंडने पाचव्या दिवशी इंग्लंडकडून जॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी शानदार फलंदाजी केली आणि पहिल्या विकेटसाठी 188 धावांची भागीदारी करून संघाला मजबूत स्थितीत आणले. या दोन्ही फलंदाजांनी पाचव्या दिवशी पहिल्या सत्रात भारताला यश मिळू दिले नाही. दुसऱ्या सत्रात भारताने चार विकेट घेतल्या, परंतु शेवटी रूट आणि स्मिथने जबाबदारी सांभाळली आणि इंग्लंडला विजय मिळवून दिला. इंग्लंडकडून डकेटने 149 धावा, क्रॉलीने 65, कर्णधार बेन स्टोक्सने 33, ऑली पोपने आठ धावा केल्या, तर हॅरी ब्रूक खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. पहिल्या डावात पाच विकेट घेणारा भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुसऱ्या डावात रिकाम्या हाताने खेळला आणि त्याला एकही विकेट घेता आली नाही.