महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ जून ।। लाडक्या बहिणींना आता दर महिन्याला योजनेच्या माध्यमातून १५०० रुपये मिळतात. सरकारकडून मिळालेल्या पैशांचं काय करावं, अनेक महिलांना प्रश्न पडतो. सरकारी योजनेच्या माध्यमातून मिळालेले पैसे योग्य ठिकाणी गुंतवल्यास त्याचा तगडा फायदा मिळू शकतो. गुंतवणुकीच्या ३ योजना महिलांना लाभदायी ठरू शकतात. या ३ योजना जाणून घेऊयात.
मुदत ठेव
तुमच्या बँक खात्यात चांगली रक्कम जमा झाली असेल, तर तुम्ही ही रक्कम फिक्स डिपॉजिटमध्ये (मुदत ठेव) गुंतवणूक करू शकता. प्रत्येक बँक एफडीवर वेगवेगळे व्याजदर देते. तुमचं वय ६० वर्षांहून अधिक असेल तर तुम्हाला इतरांपेक्षा ०.५० टक्के अधिक व्याज मिळू शकतं. १८ ते ६० वर्षांपर्यंतच्या महिला बँकेत एफडी करू शकतात.
ज्येष्ठ नागरिक बचत योजना
तुमचं वय ६० वर्षांहून अधिक असेल, तर तुम्हाला ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत पैसे गुंतवता येऊ शकतात. या योजनेसाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडावं लागेल. तुम्ही खात्यात कमीत कमी १००० रुपये ते जास्तीत जास्त ३० लाख रुपये जमा करू शकतात. तुम्हाला ज्येष्ठ नागरिक बचत योजनेच्या माध्यमातून ८.२० टक्के व्याज मिळेल.
सार्वभौम सुवर्ण रोखे
तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी करण्याऐवजी सार्वभौम सुवर्ण रोखे (सॉवरेन गोल्ड बॉन्ड) योजनेत गुंतवणूक करू शकतात. सोन्यामधील गुंतवणूक सुरक्षित मानली जाते. त्यामुळे गुंतवणुकीचा हा पर्याय देखील मानला जातो. सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेत वर्षाला २.५० व्याज मिळतं. या योजनेतून सोने खरेदीपेक्षा अधिक फायदा मिळू शकतो.
टीप – लेखातील माहिती सामान्य माहितीच्या उद्देशाने देण्यात आलीये. गुंतवणूक करताना आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.