महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ जून ।। राज्यात गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा चांगला जोर धरला आहे. अनेक जिल्ह्यांना पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. सध्या कोकण आणि घाटमाथ्यावर तुफान पाऊस पडत आहे. पण अजूनही काही जिल्ह्यांमध्ये म्हणावा तसा पाऊस पडला नाही त्यामुळे पेरणीसाठी बळीराजा चिंतेत आला आहे. आज देखील कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहणार आहे. या ठिकाणी हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज देखील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदूरबार, अमरावती, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पावसाचा अंदाज आहे. या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
तर उर्वरित विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना देखील येलो ओलर्ट देण्यात आला आहे. मुसळधार पाऊस पडणार असल्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क राहावे आणि काळजी घ्यावी असे आवाहन हवामान खात्याकडून केले जात आहे. कुठेही आडोशाला आणि झाडाखाली उभे राहून नये, असे देखील सांगितले जात आहे.
नंदुरबारमधील सातपुडा पर्वत रांगेत गेल्या ४८ तासांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे सातपुड्यातील नदीला मोठा पूर आला आहे. सोन नदीचा पूल पाण्याखाली गेला आहे. अक्राणी तालुक्यातील सोन गावाजवळ असलेल्या नदीला पूर आला आहे. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
नाशिक मध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत घट झाली असली तरी देखील पूर परिस्थिती कायम आहे. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केल्यावर पूर काही प्रमाणात ओसरला आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतल्याने गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला. ४,४०० क्यूसेकवरून १,७०० क्यूसेकपर्यंत विसर्ग कमी करण्यात आला आहे. आज आणि उद्या नाशिक घाट परिसरात पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे.
दरम्यान, कोल्हापुरातल्या मंगळवार पेठ आणि इतर भागांना ज्या तलावातून पाणीपुरवठा आजही केला जातो. तो कळंबा तलाव आता पूर्ण भरलाय. शिवाय यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदा तलाव ओसंडून वाहू लागला आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच कळंबा तलावातील पाणीपातळी पूर्णपणे घटली होती. मात्र आता काही दिवसांच्या पावसातच हा तलाव पूर्ण भरलाय. जवळपास २.७५ टीएमसी इतकी या तलावाची साठवण क्षमता आहे.