महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – मुंबई – दि. २८ ऑगस्ट – पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल दरवाढीचा सपाटा सुरूच आहे. अर्थव्यवस्था अनलॉकमधून जात असून इंधन मागणीत सुधारणा झाली आहे. कठोर टाळेबंदीतील आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी कंपन्यांनी दरवाढीचा मार्ग स्वीकारला आहे. आज शुक्रवारी पेट्रोल ११ पैशांनी महागले आहे. यामुळे मुंबईत पेट्रोल ८८.५८ रुपये झाले आहे.
पेट्रोलियम कंपन्यांनी आज शुक्रवारी पेट्रोल दरात ११ पैशांची वाढ केली. गुरुवारी पेट्रोल १० पैशांनी महागले होते. या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलचा भाव प्रती लीटर ८८.५८ रुपये झाला आहे. तर डिझेलचा भाव ८०.११ रुपयांवर स्थिर आहे. बुधवारी पेट्रोल दरवाढीला ब्रेक लागला होता, मात्र सलग दोन दिवस पुन्हा कंपन्यांनी पेट्रोल दरात वाढ केली.इंडियन ऑइलच्या आकडेवारीनुसार मागील १३ दिवसांमध्ये दोन दिवस पेट्रोलचा भाव स्थिर होता. तर उर्वरित ११ दिवसांत पेट्रोल १.५१ रुपयांनी महागले आहे.
दरवाढीने दिल्लीत पेट्रोलचा भाव ८२ रुपयांच्या उंबरठ्यावर पोहचला आहे. मुंबईत पेट्रोल ८९ रुपयांच्या नजीक पोहोचले आहे. दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८१.९४ रुपये आणि डिझेलचा भाव ७३.५६ रुपयांवर कायम आहे. चेन्नईत पेट्रोल ८४.९१ रुपये असून डिझेल ७८.८६ रुपये आहे. तर कोलकात्यात पेट्रोल ८३.४३ रुपये आहे. तर डिझेल ७७.०६ रुपये प्रती लीटर आहे.