महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – नवीदिल्ली – दि. २८ ऑगस्ट – अंतिम वर्षाच्या परीक्षेशिवाय विद्यार्थ्यांना पास करता येणार नाही, तशी पदवी देता येणार नाही, असा निकाल सुप्रीम कोर्टनं दिला आहे. परिक्षा पुढे मात्र ढकलता येऊ शकतात असं कोर्टानं म्हटलंय.तसंच राज्य सरकारांना अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबतचा निर्णय यूजीसीशी सल्लामसलत केल्याशिवाय घेता येणार नसल्याचं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं आहे.राज्य सरकारांनी पाहिजे तर परिक्षा पुढे ढकलण्यासाठी यूजीसीबरोबर चर्चा करावी असंही राज्यांना सुचवलं आहे.
यूजीसीनं परिक्षा घेण्यासाठी जारी केलेलं पत्रक योग्य असल्याचंही सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. 30 सप्टेंबरपर्यंत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबतचं पत्रक यूजीसीनं जारी केलं आहे.कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका असून देशभरातील अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्यात याव्यात, या मागणीसाठी विविध विद्यार्थी संघटनांकडून याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.
या सर्व याचिकांवर न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती आर. सुभाष रेड्डी आणि न्यायमूर्ती एम. आर. शाह यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. ही सुनावणी 18 ऑगस्ट रोजी पूर्ण झाली होती. पण खंडपीठाने आपला निर्णय सुरक्षित ठेवला होता.शिवाय सर्व पक्षांनी आपला शेवटचा युक्तिवाद लेखी स्वरूपात कोर्टासमोर दाखल करावा, असे आदेश दिले होते. ही मुदत संपल्यानंतर बुधवारी (26 ऑगस्ट) याचा निकाल येणं अपेक्षित होतं. अखेर शुक्रवारी या प्रकरणावर निकाल जाहीर करण्यात आला आहे.