महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ जुन ।। मुंबई-गोवा महामार्गाचे दुृष्टचक्र या पावसाळ्यातही सुरूच राहणार आहे. वडखळ-पेण मार्गानंतरच्या उड्डाणपुलावर पावसाचे पाणी साठण्याचे प्रकार सुरू असतानाच, या उड्डाणपुलाला तडे गेल्याचेही समोर आले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे याकडे दुर्लक्ष झाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे या मार्गाच्या मलमपट्टीसाठी होणाऱ्या कोट्यवधी रुपयांची चर्चा नाक्यावर रंगली आहे.
गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षे सुरू असून अद्याप पूर्णत्वाकडे गेलेले नाही. असे असतानाच मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्याला तडे गेले आहेत. मार्गावरील उड्डाणपुलालाही तडे गेले असून चालू पावसाळ्यात येथे रस्ते खचून अपघात घडण्याची भीती उरात घेऊन प्रवाशांचा प्रवास सुरू आहे. पोलादपूरजवळील चांढवे, महाडजवळील नांगलवाडी, विसावा हॉटेल, नातेखिंड, वहूर, वीर रेल्वे स्टेशन, लोणारे खांब, पेण आदी ठिकाणच्या उड्डाणपुलावर खड्डे आहेत. वडखळ येथून अलिबागकडे येणाऱ्या सेवारस्त्यावर मोठे खड्डे असून अनेकदा दुरुस्तीची मलमपट्टी करून बिले देण्यात आल्याचे सांगण्यात येते. खड्डे भरण्यासाठी व तात्पुरती मलमपट्टी करण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्ची पडत असून याच्या चौकशीची मागणी होत आहे.
पेणपासून सुरू होणाऱ्या उड्डाणपुलावरून पावसाचे पाणी निचरा होण्याचे योग्य नियोजन केले नसल्याने तसेच सदोष आखणीमुळे थोड्या पावसानंतरही पुलावर पाणी साचते. चालकांना अनेकदा रस्त्याचा अंदाज येत नाही. पाणी साचल्यामुळे पुलावर खड्डे पडले आहेत. यामुळे रात्री खड्डे चुकविताना अपघात होत आहेत. मंत्री, लोकप्रतिनिधींनी अनेकदा बैठका घेऊन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेऊनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.