महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ जुलै ।। हिंदी भाषा सक्तीविरोधात ठाकरे बंधूंनी एकत्र मोर्चाचं आयोजन केल्यानंतर राज्य सरकारनं त्रिभाषा धोरण राबवण्याचा जीआर रद्द केला. यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचा एकत्र विजयी मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतच विजयी मेळावा होईल पण ठिकाण चर्चेनंतर ठरवू असं सांगितलं होतं. दरम्यान, शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून विजयी मेळाव्याचं ठिकाण जाहीर करण्यात आलं आहे. शिवसेनेतून बाहेर पडून मनसेची स्थापना केल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर एकत्र दिसतील.
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातून या मेळाव्याच्या ठिकाणाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. सामनाच्या आजच्या अंकात म्हटलंय की, हिंदी सक्तीविरोधात मराठी माणसाने पुकारलेल्या एल्गारमुळे सरकारला गुडघे टेकावे लागले आणि त्रिभाषा धोरणासंदर्भातील शासकीय आदेश मागे घ्यावा लागला. हा मराठी माणसाच्या एकजुटीचा प्रचंड विजय असून, ५ जुलै हा दिवस ‘मराठी विजय दिवस’ म्हणून साजरा केला जाणार आहे. वरळी येथील डोम सभागृहात होणाऱ्या या विजयोत्सवाला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे उपस्थित राहणार असून, मेळाव्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे.
विजयी मेळाव्याच्या नियोजनासाठी शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. यासाठी ठाकरे गटाकडून संजय राऊत, अनिल परब, वरुण सरदेसाई यांनी पुढाकार घेतलाय. तर मनसेकडून बाळा नांदगावकर, अभिजीत पानसे, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई यांच्याकडे नियोजनाची जबाबदारी देण्यात आली आहे. मेळावा कसा, कधी आणि कुठे होईल यासह इतर नियोजनासाठी बैठका सुरू आहेत.
पहिलीपासून हिंदी शिकवण्याबाबतचे दोन्ही जीआर रद्द झाल्याने हा ठाकरे बंधूंचा एकत्रित विजय असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका करताना म्हटले की, मराठी ताकद एकत्र येऊ नये, हा सरकारचा कुटील डाव होता. पण मराठी माणसाच्या एकजुटीमुळे सरकारला जीआर मागे घ्यावा लागला. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. फडणवीस म्हणाले होते की, दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये, असा कोणताही जीआर आम्ही काढला नव्हता.