सरकारचं आर्थिक संतुलन ढासळलंय, अर्थसंकल्पाबाबत जयंत पाटलांची सरकारवर टीका

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ जुलै ।। ‘राज्यावरील आर्थिक बोजा वाढल्याने गरिबांवर, दुर्लक्षित समाजावर अन्याय होत आहे. एसटी, एससी, ओबीसी यांच्यावर खर्च होणारा पैसा कागदावर दाखवला जातो आणि ३१ मार्चला कळते, की तो खर्चच झालेला नाही. राज्य सरकारला आता अर्थसंकल्पाचे संतुलन टिकवणे अवघड झाले आहे,’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोमवारी केली.

पुरवणी मागण्यांवरून त्यांनी सरकारला लक्ष्य केले. ‘चालू आर्थिक वर्षात मांडलेल्या अर्थसंकल्पात सरकारने एक विक्रम केला, असा उल्लेख मी यापूर्वी केला होता. त्या वेळी महसुली तूट ही ४५ हजार ८९१ कोटी रुपयांची होती. राज्याच्या अर्थमंत्र्यांनी आज पुन्हा पुरवणी मागण्या मांडल्या. त्या ५७ हजार ५०९ कोटींच्या आहेत. मागण्या मंजूर होतीलच तेव्हा सरकारला एक लाख तीन हजार ४०० कोटी रुपये कमी पडणार आहेत,’ अशी शक्यता त्यांनी वर्तवली.

तालिका अध्यक्ष जाहीर
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानसभा आणि विधान परिषदेसाठी तालिका अध्यक्षांची नावे सोमवारी जाहीर करण्यात आली. विधानसभेसाठी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेच्या आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी परिषदेच्या तालिका अध्यक्षांची नावे जाहीर केली. विधानसभेचे तालिकाअध्यक्ष म्हणून आमदार अमित साटम, किशोर आप्पा पाटील, सुलभा खोडके, चेतन तुपे, नितीन देशमुख, संजय मेश्राम, अभिजीत पाटील, समीर कुणावार, समाधान अवताडे यांची, तर विधान परिषदेचे तालिका सभापती म्हणून आमदार अमित गोरखे, इद्रिस नायकवडी, कृपाल तुमाने, सुनील शिंदे आणि डॉ. प्रज्ञा सातव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचा जागर
हिंदसक्तीवरून राज्य सरकारने माघार घेतल्याच्या पार्श्वभूमीवर सुरू विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारी सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी विरोधकांनी सरकारला घेरण्यासाठी पायऱ्यांवरच मराठीचा जागर करीत राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी मराठीच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करतानाच राज्य सरकारने हिंदी सक्तीवरून घेतलेली माघार लक्षात घेता राज्य सरकार, माघार सरकार असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली. हिंदी भाषा सक्तीचा निर्णय मागे घेतला. एकप्रकारे हा मराठी माणसांचा विजय असल्याचे विरोधकांकडून यावेळी जाहीर करण्यात आले. पहिल्याच दिवशी करण्यात आलेल्या आंदोलनाला उबाठाचे आदित्य ठाकरे, अंबादास दानवे सचिन अहिर, भास्कर जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील आदी उपस्थित होते. आघाडीतील आमदारांनी विधान भवनातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *