Video : हिमाचल प्रदेशात हाहाकार : एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ जुलै ।। हिमाचल प्रदेशमधील अनेक भागात निसर्गाचा प्रकोप बघायला मिळाला. तब्बल ११ ठिकाणी ढगफुटी झाली. नद्या-नाल्यांना अचानक आलेला पूर आणि बऱ्याच ठिकाणी झालेल्या भूस्खलनामुळे हाहाकार उडाला. राज्यातील वेगवेगळ्या भागात घडलेल्या या घटनांत १० जणांचा मृत्यू झाला आहे. ३० जण बेपत्ता असून, यात एकाच घरातील ६ जणांचा समावेश आहे. सगळ्यात जास्त कहर मंडी जिल्ह्यात झाला आहे. या पावसाने २०२३ च्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या.

हिमाचल प्रदेशात मंगळवारी ११ ठिकाणी ढगफुटी झाली. चार ठिकाणी अचानक पूर आला, तर एका ठिकाणी भयंकर भूस्खलन झाल्याची घटना घडली. यात सर्वात जास्त फटका मंडी जिल्ह्याला बसला आहे. मंडी जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून, २४ तासांमध्ये २५३.८ मिमी पाऊस पडला आहे.

कोणत्या ठिकाणी झाली ढगफुटी?
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी (१ जुलै) दिवसभरात ११ ठिकाणी ढगफुटी झाली. यातील सात ठिकाणे मंडी जिल्ह्यातील आहेत. अचानक आलेल्या पुरांमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. चुलाथाजमध्ये अचानक पूर आल्याने शेकडो झाडे उन्मळून पडली आणि वाहून गेली.

पुराच्या पाण्यात अनेकजण वाहून गेले आहेत. प्रशासनाच्या माहितीनुसार, ३० लोक बेपत्ता असून, त्यांचा शोध सुरू आहे. एकाच कुटुंबातील ६ जण बेपत्ता आहेत.

मंडी जिल्ह्यातील गोहरमध्ये चार ठिकाणी, करसोगमध्ये तीन ठिकाणी, तर धरमपूरमध्ये दोन ठिकाणी तर थुनागमध्ये एका ठिकाणी ढगफुटी झाली.

५०० कोटींचे नुकसान
हिमाचल प्रदेशातील अनेक भागात ढगफुटी आणि अतिवृष्टी झाली आहे. मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी सांगितले की, आपत्तीमुळे राज्यात आतापर्यंत ५०० कोटींचे नुकसान झाले आहे. हा आकडा आणखी वाढण्याचा अंदाज आहे.

मंडी, ऊना, बिलासपूर, हमीरपूर आणि शिमला या जिल्ह्यांना पुढील काही तासांत अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. काही जिल्ह्यात अचानक पूर येण्याचा धोका असून, प्रशासनाला सतर्कतेचा इशारा दिला गेला आहे.

मदत आणि शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. एनडीआरएफच्या तुकड्या बोलवण्यात आल्या आहेत. एसडीआरएफची पथकेही पोलिसांसोबत मदत कार्यात आहेत. मंडी जिल्ह्यातील सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. अनेक ठिकाणी घरे पडली आहे. काही ठिकाणी रस्ते वाहून गेले आहेत. त्यामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *