![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ जुलै ।। चार दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा जोर धरल्याने श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणीपातळीत वेगाने वाढ होत आहे. मंदिरातील पाणी ओसरल्याने नुकताच ‘उतरता दक्षिणद्वार सोहळा’ पार पडला होता, मात्र आता पुन्हा पाणीपातळी वाढत असल्याने दुसऱ्यांदा ‘चढता दक्षिणद्वार सोहळा’ अनुभवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्या आठवड्यात पावसाने उसंत घेतल्याने नद्या पात्रात परतल्या होत्या. त्यामुळे श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या पादुका दर्शनासाठी खुल्या झाल्या आणि हजारो भाविकांनी ‘उतरता दक्षिणद्वार सोहळा’ भक्तिभावाने अनुभवला.
मात्र, गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे नद्या पुन्हा दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. आज (बुधवारी) सायंकाळपर्यंत मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत पाणी पोहोचून ‘चढता दक्षिणद्वार सोहळा’ होण्याची शक्यता आहे. हा सोहळा म्हणजे निसर्ग आणि भक्तीचा एक अद्भूत संगम मानला जातो. पाण्याखालील पादुकांचे दर्शन हीच दत्तभक्तांसाठी एक अलौकिक अनुभूती असते. त्यामुळे, भगवान श्री दत्तात्रेयांच्या जलरूपी सान्निध्याचा हा ‘साक्षात्कारी’ अनुभव घेण्यासाठी भाविक आतुरतेने वाट पाहत आहेत.
