महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ जुलै ।। वाखरी : जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा सोहळा पंढरीनाथाच्या दर्शनासाठी आतुर झालेला असताना आजच्या वाटचालीत ऊन आणि पाऊस झेलत दुसरे उभे रिंगण पार पडले. त्यानंतर हा सोहळा शुक्रवारी संध्याकाळी वाखरीत विसावला.
पीराची कुरोलीत सकाळी सहा वाजता पादुकांना अभिषेक करण्यात झाला. काकड आरती झाली. पालखी समोर सकाळी सात वाजता नंदकुमार देहूकर दिंडीच्यावतीने कीर्तन झाले. दरम्यान, रथ दोन मोर, फुलांनी तयार केलेले विठ्ठल रुक्मिणीची आकर्षक मूर्ती, संत तुकाराम महाराजांचे छायाचित्र आणि ‘तुका झालासे कळस’ असे नामोल्लेख केलेला रथ फुलांनी सजवला होता.
त्यानंतर, दिंड्यामध्ये जेवण सुरू झाले. यंदाच्या ३४० व्या सोहळ्यातील शेवटच्या मुक्कामासाठी सोहळा वाखरीकडे दुपारी बारा वाजता मार्गस्थ झाला. त्यानंतर, काही अंतरावर देहू संस्थानच्या माजी अध्यक्ष ताराबाई इनामदार यांच्या समाधी समोर आरती करण्यात आली. दुपारी पावणे बारा वाजता सोहळा पुणे-पंढरपूर या मुख्य रस्त्यावर आला.
पीराची कुरोली गावातील ग्रामस्थ मुख्य रस्त्यापर्यंत निरोप देण्यासाठी सहभागी झाले होते. वाडी कुरोली येथे पहिला विसावा घेतला. त्यानंतर, सोहळा वाटचाल करीत भंडीशेगावला सव्वा तीन वाजता दुपारच्या विसावा पोचला. या ठिकाणी परिसरातील नागरिकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. उड्डाणपूल झाल्याने वाहने पुलावरून जात होती. वाहनांची गर्दी सोहळ्याला जाणवत नव्हती. पावसाची सर बरसत असताना सोहळा उभ्या रिंगणासाठी मार्गस्थ झाला.
दरम्यान, माऊलींचा सोहळा उड्डाण पुलाच्या कडेने बाजीराव विहीर या ठिकाणी रिंगणासाठी गेला होता. त्या रस्त्यावर गर्दी झाल्यामुळे माऊलींच्या सोहळ्यातील काही दिंड्या उड्डाणपुलावरून पुढे मार्गस्थ झाल्या. त्यांच्यापाठोपाठ संत तुकाराम महाराजांचा सोहळ्यातील चौघडा पावणेपाच वाजण्याच्या सुमारास उड्डाणपुलाची मध्यावर पोचला. तर पाच वाजता रथ उड्डाणपुलावरून शंभर मीटरवर उतरला.
रथामागील दिंड्या उड्डाणपुलावर उभ्या रिंगणासाठी पोहोचल्या होत्या. त्यावेळी पाऊस थांबला होता. त्यानंतर, काका चोपदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उभे रिंगण लावले. संस्थानचे आजी- माजी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी, दोन्ही अश्व रथाच्या दिशेने धावले, रथामागील २०-२५ दिंड्यांपर्यत पोचले. रथातील पादुकांचे दर्शन घेऊन नगारखान्या जवळ अश्व पोचले. त्यावेळी, ज्ञानोबा-तुकाराम असा जयघोष सुरू होता.
रिंगणानंतर हरिपाठाचे अभंग सुरू होते. संध्याकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास सोहळा मुक्कामी विसावला. यावेळी ठाकूरबुवा दैठणकर दिंडीच्या वतीने कीर्तन तर पुणे येथील नवी पेठ मंडळ यांच्या वतीने रात्री जागर झाला.