![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ जुलै ।। राज्य सरकारच्या धोरणाविरोधात जाऊन शहर-उपनगरात धावत असलेली बाइक टॅक्सी अखेर बंद झाली आहे. ॲप आधारित टॅक्सीसेवा पुरवणाऱ्या ओला, उबर अशा कंपन्यांनी आपल्या मोबाइल ॲपमधून बाइक टॅक्सीचे आरक्षण करण्याची सुविधा बंद केली आहे. बाइक टॅक्सी बंद झाली असली तरी सरकारमान्य ई-बाईक टॅक्सी कधी सुरू होणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे.
शहरात बाइक टॅक्सीच्या माध्यमाने सुरू असलेल्या बेकायदा प्रवासी वाहतुकीचा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतः अनुभव बुधवारी रात्री घेतला. मंत्र्यांनी बाईक टॅक्सी आरक्षित करताना परिवहन विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांना फोन करून आढावा घेतला होता. त्यावेळी शहरात बाइक टॅक्सी बंद असल्याचे उत्तर त्यांना मिळाले होते. त्यानंतर मंत्री सरनाईक यांनी परिवहन विभागातील अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.
शहरात ओला, उबर अशा ॲप आधारित प्रवासी सेवा देणाऱ्या प्रमुख कंपन्या आहेत. यांच्या मोबाइल ॲपमधून दुचाकी, टॅक्सी, रिक्षा तसेच शहराबाहेर जाण्यासाठी खासगी वाहनांचेही आरक्षण केले जाते. ओला मोबाइल ॲपमध्ये बाइक टॅक्सी असे दाखवण्यात येत असले तरी त्यातून बाइक टॅक्सी आरक्षित झालेली नाही. उबर ॲपमध्ये बाइक टॅक्सीच दिसत नाही. शुक्रवार सकाळपासून तिन्ही ॲपमधून बाइक टॅक्सी आरक्षित झाली नाही, असे प्रवासी दिनेश महाडिक यांनी सांगितले.
परिवहन विभागाच्या तक्रारीनंतर आझाद मैदान पोलिस ठाण्यात उबर व रॅपिडो ॲपविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ओला ॲपविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. बेकायदा प्रवासी वाहतुकीमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होत असल्याने मोटार वाहन कायद्यानुसार आवश्यक ती कारवाई करण्याचे राज्यातील सर्व प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना निर्देश देण्यात आले आहेत, असे परिवहन विभागाकडून स्पष्ट केले आहे.
