महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०९ जुलै ।। लाडकी बहीण योजनेसाठी (Ladki Bahin Yojana) पात्र असलेल्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेचं पोर्टल गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे लाभार्थी असूनही अनेक महिलांना योजनेचा लाभ घेता येत नाही. या योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना आता अर्ज करता येत नाहीये. त्यामुळे नव्याने सहभागी होण्याच्या तयारीत असणाऱ्या महिला या लाडक्या बहिणी नाहीत का असा प्रश्न विचारला जात आहे.
लाडकी बहीण योजना जून २०२४ मध्ये सुरु करण्यात आली आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याचे पोर्टल बंद करण्यात आले आहे. ऑक्टोबर महिन्यापर्यंतच महिलांना या योजनेसाठी अर्ज करता येत होता. त्यामुळे आता या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही.
या योजनेसाठी नव्याने पात्र ठरलेल्या महिलांना सहभागी करुन घेणे गरजेचे आहे, असं महिलांचे म्हणणे आहे. तसेच अनेक महिलांच्या अर्जामध्ये काही तांत्रिक त्रुटी असल्याने योजनेअंतर्गत पैसे जमा होत नाही. त्यामुळे अर्जामधील दुरुस्तीसाठी पोर्टल सुरु करणे आवश्यक आहे. याचसोबत नव्याने २१ वर्ष पूर्ण झालेल्या महिलांनाही योजनेचा लाभ मिळायला हवा, त्यामुळे पोर्टल सुरु करण्यास साांगितले आहे.
लाडकी बहीण योजनेची पात्रता (Ladki Bahin Yojana Eligibility)
लाडकी बहीण योजनेसाठी २१ ते ६५ वयोगटातील महिला लाभ घेऊ शकतात. महिला महाराष्ट्राची रहिवासी असणे अनिवार्य आहे. महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त नसावे. महिला सरकारी नोकरी करत नसाव्यात. तसेच महिलांच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन नसावे.