महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – ३० ऑगस्ट – पुणे – पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमधील प्रशासकीय सुधारणांमुळे स्मार्ट सिटी प्रकल्पात पुण्याचा क्रमांक 28 वरून 15 व्या क्रमांकावर पोचला आहे. त्यामुळे पुणे हे राज्यात अव्वल शहर ठरले आहे.
देशातील 100 स्मार्ट सिटी प्रकल्पांवर केंद्र सरकारकडून नियमित देखरेख ठेवली जाते. मिळालेला निधी, केलेला खर्च आदींवर केंद्र सरकारकडून मानांकन ठरविले जाते. 21 ऑगस्ट रोजी मानांकनात पुणे शहराचा क्रमांक 28 व्या क्रमांकावर गेला होता. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस तसेच शहरातील विविध संस्था व स्वयंसेवी संस्थांनी पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनवर टीकेची झोड उठविली होती. स्मार्ट सिटी प्रशासनाने केलेल्या कामांच्या नोंदी केंद्र सरकारकडे वेळेत पोचविल्या नव्हत्या. त्यामुळे पुणे शहराचे मानांकन घसरले होते. त्यामुळे दोन अधिकाऱ्यांना स्मार्ट सिटीने कामावरून कमी करून, नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. या पार्श्वभूमीवर गेल्या पाच दिवसांत नोंदी “अपडेट’ करण्याचे काम वेगाने पूर्ण करण्यात आले. परिणामी शहराचे मानांकन उंचावले आहे.
सुधारित मानांकनाबद्दल समाधान व्यक्त करून महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, “”नियोजित प्रकल्प राबविण्याबरोबरच पुणे स्मार्ट सिटीने लॉकडाउनच्या कालावधीतही कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये पुढाकार घेतला आणि कमांड अँड कंट्रोल सेंटरचा वॉर रूम म्हणून अत्यंत प्रभावीपणे उपयोग केला आहे. तसेच प्रगतिपथावर असलेल्या प्रकल्पांमुळे स्मार्ट सिटी मिशनमधील पुणे शहराचे स्थान आणखी उंचावेल असा विश्वास आहे.”
स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल म्हणाल्या, “”लॉकडाउनपूर्वी सुरू केलेली कामे निरंतर सुरू आहेत. त्याशिवाय कोरोना प्रतिबंधाच्या अनुषंगाने पुणे स्मार्ट सिटीने नवे डिजिटल उपक्रम सुरू केले आहेत. तसेच, स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर करून वॉर रूमद्वारे पुणे स्मार्ट सिटी सर्वतोपरी योगदान देत आहे. यामुळे स्मार्ट सिटीची कामगिरी निश्चितच उंचावली आहे.”
प्रकल्पांच्या सद्यःस्थितीची अद्ययावत माहिती केंद्र शासनाच्या प्रणालीमध्ये “ऑनलाइन अपडेट’ करण्यात आली आहे. यामुळे कामगिरीच्या अनुषंगाने पुणे स्मार्ट सिटीचे क्रमवारीतील स्थान तथा मानांकन उंचावले आहे. पुण्याने राष्ट्रीय क्रमवारीत 28 वरून थेट 15 व्या स्थानावर झेप घेतली आहे. लॉकडाउनपूर्वी पुणे 17 व्या क्रमांकावर होते तर मधल्या काळात 28 व्या क्रमांकावर पोचले होते.
राज्यातील शहरांचे राष्ट्रीयस्तरावरील मानांकन
पुणे- 15,
नाशिक- 16 ,
नागपूर- 42 ,
सोलापूर- 44,
ठाणे- 55 ,
पिंपरी चिंचवड- 61,
कल्याण डोंबिवली- 62,
औरंगाबाद- 67