महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० जुलै ।। मालिकेत १-१ बरोबरी, सध्या तरी दिसणारी हिरवे गवत असलेली खेळपट्टी, जसप्रीत बुमरा आणि जोफ्रा आर्चर यांचे पुनरागमन आणि गरम हवामानाचा अंदाज, अशा स्थितीत क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्डसवर उद्यापासून सुरू होणाऱ्या भारत-इंग्लंड मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात कोण बाजी मारणार? याची उत्सुकता ताणली आहे.
दोन कसोटी सामन्यांत केलेल्या सातत्यपूर्ण चांगल्या खेळाने भारतीय संघाबाबतचे मत बदलले गेले आहे. इंग्लंड संघावर टीका होताना भारतीय संघाचे कौतुक होत आहे. इंग्लंडच्या माजी खेळाडूंना, प्रेक्षकांना आणि माध्यमांना बेन स्टोक्सच्या संघाकडून सुधारित खेळ होणे अपेक्षित आहे. पहिल्या दोन सामन्यांत भारतीय संघाने इंग्लंडच्या गोलंदाजांना चांगलेच थकवले. भरपूर धावा काढताना भरपूर षटके टाकायला लावली. साहजिकच तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंड संघात बदल केले गेले आहेत आणि जोफ्रा आर्चरला मोठ्या अपेक्षांसह संघात दाखल करून घेतले आहे.
भारतीय संघात बुमराच्या परत येण्याने पहिल्या दोन सामन्यांत छाप पाडू न शकलेल्या प्रसिध कृष्णाला संघातून बाहेर ठेवले जाईल. खेळपट्टीचा हिरवा रंग कायम राहिला, तर वॉशिंग्टन सुंदरच्या जागी साई सुदर्शनला परत संधी मिळेल. भारतीय संघातील बरेच खेळाडू पहिल्यांदा लॉर्डस मैदानावर कसोटी सामना खेळणार आहेत. या वास्तूच्या खासपणाची आणि अतिरेकी शिस्तीची सवय करून घेऊन मग खेळावर लक्ष केंद्रित करायला भारतीय संघाला दोन दिवसांचा केलेला सराव पुरेसा पडणार आहे.
खेळपट्टी नक्की कसा स्वभाव दाखवेल याचा खरा ठोक अंदाज कोणाला लागत नाहीये. खेळपट्टीच्या ताजेपणाचा फायदा घ्यायला प्रथम गोलंदाजी करायची की पहिल्या दोन सामन्यांत काय झाले याचा विचार करून फलंदाजी करून मोठी धावसंख्या फलकावर लावायचा प्रयत्न करायचा या द्विधा विचारात दोन्ही कप्तान असणार. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकन संघाने पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊन ऑस्ट्रेलियन संघाचा पहिला डाव लवकर संपवला होता त्याचासुद्धा विचार केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आतापर्यंत भारतीय संघ जेव्हा कधी इंग्लंडच्या दौऱ्यावर आला तेव्हा दोन सलग कसोटी सामन्यांत विजय मिळवता आलेला नाही. जसा एजबॅस्टन कसोटी सामना जिंकून भारतीय संघाने इतिहास नव्याने लिहिला तसाच नवी नोंद तिसरा कसोटी सामना जिंकून करायची मनीषा शुभमन गिल मनात बाळगून आहे.
जबाबदारीची फलश्रुती : रिषभ पंत
दुसऱ्या सामन्यात बुमरा नसल्याने सिराज आणि आकाशदीपवर नव्याने संघाच्या माऱ्याचे नेतृत्व करायची जबाबदारी आली होती. दोघांनी तीच जबाबदारी मस्तपैकी पार पाडली. जबाबदारी खऱ्या अर्थाने चांगले काम करत आहे. तुम्हाला लक्ष एकाग्र करायला मदत करते आणि सर्वोत्तम कामगिरी करायला प्रोत्साहित करते. शुभमनवर कर्णधार आणि माझ्यावर उपकर्णधार म्हणून जबाबदारी आल्याने आमच्या फलंदाजीत बदल झालाय असे वाटते ना तुम्हाला, असे हसत हसत म्हणून पंतने आपले विचार मांडले.
आर्चर खेळायला सज्ज : बेन स्टोक्स
केवळ गरज म्हणून आम्ही निवड केली नाहीये. जोफ्रा आर्चर मेहनत करून तंदुरुस्त होन संघात परततो आहे. दुखापतीनंतर व्यवस्थित तंदुरुस्तीचे काम करून आर्चर परतला आहे. गेले काही वर्षे तो मर्यादित षटकांचे क्रिकेट भरपूर खेळला आहे. कसोटी सामन्यात येणारा ताण सहन करायची त्याची पूर्ण तयारी झाली आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याची गोलंदाज म्हणून क्षमता वादातीत आहे, असे म्हणत इंग्लंड कर्णधार बेन स्टोक्सने जोफ्रा आर्चर संघात आल्याचे स्वागत आणि समर्थन केले.