महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० जुलै ।। विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी (ता. ९) दुपारनंतर शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांत जोरदार हजेरी लावली. त्यामुळे पुणेकरांची एकच धांदल उडाली. यावेळी सलग दोन ते अडीच तास झालेल्या पावसाने रस्त्यावर पाणी साचले; तर मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू होता. सायंकाळी सहापर्यंत शिवाजीनगरला सहा, तर पाषाणला पाच मिलिमीटर पावसाची नोंद झाली. येत्या आठवडाभर आकाश ढगाळ राहून हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.
जूनमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. मात्र, जुलैच्या सुरुवातीला पावसाने उसंत घेतली होती. दुसरा आठवडा संपत आला; तरी पावसाचा जोर वाढत नव्हता. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून हवामान कोरडे झाले होते. कमाल तापमानात वाढ होऊन पाऊस थांबला होता. ढगाळ वातावरण होते; मात्र, पाऊस नव्हता. बुधवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी चारनंतर उपनगरांसह शहराच्या मध्यवर्ती भागात काळे ढग भरून आले आणि जोरदार सरींनी सुरुवात झाली. सलग दोन तास पाऊस पडला. त्यानंतरही सरी बरसत होत्या. पुणे ग्रामीणमध्ये मुळशीतील गिरीवन येथे सर्वाधिक ३७ मिलिमीटर पाऊस झाला.
विद्यार्थी, नोकरदारांची तारांबळ दुपारी पाऊस पडायला सुरुवात झाल्यावर सर्वांना वाटले, की पाच ते दहा मिनिटांमध्ये उघडेल. मात्र, तो सलगपणे पडल्याने शाळा, महाविद्यालयांतून घरी जाण्याची वेळ झाल्याने विद्यार्थ्यांसह कार्यालयातून घरी जाणाऱ्या नोकरदारांची तारांबळ उडाली. त्यात महत्त्वाच्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्यामुळे पोलिसांचीही डोकेदुखी वाढली होती.
येथे पडला पाऊस
शिवाजीनगरसह स्वारगेट, हडपसर, मगरपट्टा, येरवडा, विश्रांतवाडी, खराडी, औंध, पाषाण, एनडीए , कोथरूड, वारजे, धायरी, कात्रज, आंबेगाव, कोंढवा, मुंढवा, धनकवडी व जिल्ह्यातील बहुतांश भागांत दुपारनंतर पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडल्या. घाटमाथ्यावर जोरदार; तर एक ते दोनमध्ये अतिजोरदार पावसाच्या सरी पडल्या. पुढील चार ते पाच दिवस शहरात आकाश सामान्यतः ढगाळ राहील, तर पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडतील, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.