MHADA Lottery: हक्काचं घर घ्यायची सुवर्णसंधी! म्हाडाच्या 5000 घरांबाबत मोठी अपडेट, उद्यापासून करता येणार अर्ज

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ जुलै ।। कोकण गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे शहर आणि जिल्हा, तसेच वसई (जि. पालघर) येथील विविध गृहनिर्माण योजनांअंतर्गत ५ हजार २८५ सदनिका आणि ओरोस (जि. सिंधुदुर्ग), कुळगाव-बदलापूर येथील ७७ भूखंड विक्रीसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे. या सोडतीसाठी अर्जनोंदणी आणि भरणा प्रक्रियेचा प्रारंभ ‘गो-लाइव्ह’ कार्यक्रमांतर्गत उद्या, सोमवारी दुपारी १ वाजता म्हाडाचे उपाध्यक्ष, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते होणार आहे.

कोकण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेली ही सोडत पाच घटकांमध्ये विभागण्यात आली आहे. २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत एकूण ५६५ सदनिका, १५ टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेअंतर्गत ३,००२ सदनिका, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना व विखुरलेल्या सदनिका आहे त्या स्थितीमध्ये या योजनेअंतर्गत १,६७७ सदनिका, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेअंतर्गत (५० टक्के परवडणार्‍या सदनिका) ४१ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेअंतर्गत ७७ भूखंड विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

या सोडतीसाठी १३ ऑगस्ट रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत आहे. १४ ऑगस्ट रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्जदार अनामत रकमेचा भरणा ऑनलाइन करू शकतील. सर्व कागदपत्रांची पूर्तता करणारे अर्जदार या प्रणालीद्वारे पात्र ठरविले जातील. सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची प्रारूप यादी २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाणार आहे. २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत अर्जदारांना प्रारूप यादीवर दावे व हरकती नोंदविता येणार आहेत. सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची अंतिम यादी १ सप्टेंबरला सायंकाळी ६ वाजता म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. ३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता पात्र अर्जाची संगणकीय सोडत ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे जाहीर केली जाणार आहे.

अर्जनोंदणी प्रक्रिया
कोकण मंडळाच्या संगणकीय सोडतीमध्ये IHLMS 2.0 संगणकीय प्रणाली व अॅपच्या साहाय्याने अर्जनोंदणी प्रक्रियेस १४ जुलै रोजी दुपारी १ वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. सोडतीत सहभाग घेण्यासाठी अर्जदार IHLMS 2.0 ही सोडतीची संगणकीय आज्ञावली अँड्रॉइड अथवा आयओएस या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टिमच्या साहाय्याने आपल्या मोबाइलवर डाउनलोड करू शकतात. अर्जदारांच्या सोयीकरिता https://housing.mhada. gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्जनोंदणी प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *