Monsoon Session: आव्हाड-पडळकर समर्थक भिडले, विधानभवनाच्या पायऱ्यांवर धक्काबुक्की, हाणामारी अन् शिवीगाळ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ जुलै ।। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंड पडळकर यांच्यातील वाद काही थांबायला तयार नाही. आज विधानभवनात आव्हाड आणि पडळकर समर्थकांनी मोठा राडा घातला. दोघांच्याही कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. विधानभवनाच्या पायऱ्यांजवळ हे समर्थक भिडले. सर्वात धक्कादायक म्हणजे विधानभवनाच्या आवारात हा सारा प्रकार घडला आहे.

एकदिवसापूर्वी गोपीचंद पडळकर आणि आव्हाड यांच्यात जोरदार वाद झाला होता. हे प्रकरण शिवीगाळपर्यंंत गेलं होतं. त्यानंतर आता विधानभवनात या दोघांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले आहेत. दोघांच्याही कार्यकर्तांमध्ये तुफान हाणामारी झाली, एकमेकांना शिवीगाळही करण्यात आली.

याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, सध्या मुंबईत पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यादरम्यान गुरुवारी (17 जुलै) दुपारच्या सुमारास गोपीचंद पडळकर आणि आव्हाड यांचे कार्यकर्ते विधानभवनाच्या पायऱ्यांजवळ होते. यावेळी त्यांच्यात धक्काबुक्की झाली, दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना शिवीगाळ करत मारहाण केली, धक्काबुक्की झाली. प्रकरण वाढत असल्याचं लक्षात येताच विधानभवन परिसरात उपस्थित असलेल्या सुरक्षारक्षकांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला. जवळपास पाच ते दहा मिनिटं हा वाद सुरु होता. यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना मारहाण आणि शिवीगाळही केली.

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

या प्रकरणानंतर जितेंद्र आव्हाड हे माध्यमांसमोर आले, त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारताच त्यांनी विचारलं की हल्ला कोणी केला. पत्रकार म्हणाले की पडळकर समर्थकांनी केला. त्यानंतर जितेंद्र आव्हाड भडकलेले दिसले. अख्ख्या महाराष्ट्राला दिसलं की हल्ला कोणी केला, आम्हाला यापेक्षा जास्त काही पुरावा द्यायचा नाही. जर तुम्ही विधानसभेत गुंडांना प्रवेश देणार असाल, ते आमच्यावर हल्ला करणार असतील तर आमचे लोक सुरक्षित नाहीयेत. मला शिवीगाळ केली, मारण्याची धमकी दिली, असं आव्हाड म्हणले. हे सगळे मलाच मारण्यासाठी आले होते, असंही ते म्हणाले.

विधानभवनात आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचं आमदार, काय गुन्हा आहे आमचा. सत्तेचा इतका मुजोरपणा, इतका माज, असं म्हणत आव्हाड चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *