आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. 22 जुलै ।। राज्यात महायुती सरकार येऊन १० महिने झाले मात्र सरकारमागचे वादाचे ग्रहण काही केल्या सुटेना. काही महिन्यांपूर्वी बीडमधील संतोष देशमुख प्रकरणात वादात अडकलेले धनंजय मुंडे यांना मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आता पुन्हा सरकारमधील दुसरा मंत्री राजीनामा देण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. विधानसभेत रमी खेळताना व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढला आहे. कोकाटे यांनी व्हिडिओबाबत खुलासा केला मात्र तो त्यांच्या पक्षालाही पटला नाही. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्‍यांची नाराजी आणि अजित पवारांशी फोनवरून संवाद झाल्यानंतर माणिकराव कोकाटे आज त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत.

विधानसभेत कामकाज सुरू असताना माणिकराव कोकाटे हे मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी शेअर केला. त्यानंतर विरोधकांनी कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. गेल्या २ दिवसांत या प्रकरणावरून महायुती सरकार बॅकफूटवर गेल्याचे दिसून आले. मुख्यमंत्र्‍यांच्या नाराजीनंतर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रमुख अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांच्याशी फोनवरून संवाद साधल्याची माहिती सूत्रांनी दिली. अजित पवार यांच्या फोननंतर कोकाटे यांनी महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची सिन्नर येथील दूध संघाच्या कार्यालयात बैठक घेतल्याचे समजते.

मागाल तेवढे पुरावे देतो, विरोधकांचा हल्लाबोल
विधिमंडळाचे कामकाज सुरू असताना कृषिमंत्री माणिकराव कोकाटे जंगली रमी खेळत होते त्याचे आणखी किती पुरावे हवेत ते सांगा, मागाल तेवढे पुरावे देतो असं आव्हान शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहे. आव्हाड यांनी कोकाटेंचे दोन व्हिडिओ एक्सवर पोस्ट करताना म्हटलं की, आता मी दोन व्हिडिओ देतोय, दोन्ही व्हिडिओ व्यवस्थित बघा, कुठला पत्ता, कुठे आणि कसा हलवला आहे हे दिसेल. कोकाटे हे ऑनलाईन जुगाराचे पत्ते बोटाने सरकवत आहेत असं त्यांनी सांगितले.

दरम्यान, सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत गोंधळ घालणाऱ्या छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण करणे अजित पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना भोवले आहे. अजित पवार यांच्या आदेशानंतर पक्षाने सूरज चव्हाण यांची पदावरून हकालपट्टी केली आहे. रविवारी लातूर येथे तटकरेंच्या पत्रकार परिषदेच्या ठिकाणी जाऊन छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला. या कृत्याने संतप्त झालेल्या सूरज चव्हाण यांच्यासह कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केली. या मारहाणीनंतर सूरज चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केली असून मारहाण झालेल्या विजय घाडगेंना भेटणार असल्याचे सांगितले. मात्र सूरज चव्हाण यांच्या मारहाणीमुळे मराठवाड्यात छावा संघटना अजित पवारांच्या राष्ट्रवादीविरोधात चांगलीच आक्रमक झाल्याचे दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *