महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – ओमप्रकाश भांगे – दि. ३१ ऑगस्ट – पुणे – राज ठाकरे यांचा एक ताजा फोटो व्हायरल झाला असून त्यात राज यांनी दाढी वाढवून त्याला खास शेप दिल्याचे दिसत आहे. दाढी राखलेले राज ठाकरे टीशर्ट आणि गॉगलमुळे एका वेगळ्याच आकर्षक लूकमध्ये पाहायला मिळत आहेत. या लूकवर राज यांची अद्याप कोणतीच प्रतिक्रिया आलेली नसली तरी राज यांचा नव्या लूकमधील फोटो तुफान व्हायरल झाला आहे. राज यांच्या नव्या लूकची चर्चाही जोरदार रंगली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच आपली वेगळी छाप सोडणारे आणि सर्वात लक्षवेधी नेते असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी कोणत्याही धडक आंदोलनामुळे वा इशाऱ्यामुळे नव्हे तर नव्याकोऱ्या लूकमुळे राज ठाकरे यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं बोट धरून राज ठाकरे राजकारणात आले होते. राज यांच्या वागण्या बोलण्यात नेहमीच बाळासाहेबांची झलक पाहायला मिळत असते. आताही राज यांच्या नव्या लूकने त्याचा प्रत्यय आला आहे. बाळासाहेबांनी नंतरच्या काळात दाढी ठेवायला सुरुवात केली होती. नंतर दाढीतला लूक चांगला दिसतो म्हणून बाळासाहेबांनी दाढी कायमची ठेवली. आता राज यांनी दाढी ठेवल्याने येत्या काळात राज भारदस्त दाढीत दिसणार का?, अशी चर्चाही होऊ लागली आहे.
दरम्यान, राज ठाकरे यापूर्वीही अनेकदा हटके लूकमुळे चर्चेत राहिले आहेत. राज यांनी काही वर्षांपूर्वी लांब केस वाढवले होते. तेव्हाचा त्यांचा लूक फार चर्चेत आला होता. जानेवारी महिन्यात मुंबईत मनसेचं महाअधिवेशन झालं. या अधिवेशनातील राज यांचा लूकही चर्चेचा विषय ठरला होता.