महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – ओमप्रकाश भांगे – दि. ३१ ऑगस्ट – पुणे – राज्यात यंदा मुंबई, मुंबईतील उपनगरांसह नगर आणि औरंगाबाद जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सर्वाधिक सरी पडल्या. या भागात पावसाची सरासरीपेक्षा खूप जास्त नोंद झाली. मात्र, विदर्भातील अकोला, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये पावसाने ओढ दिली.
देशात यंदा बरोबर 1 जूनला केरळमध्ये दाखल झालेला मॉन्सून महाराष्ट्रात 11 जूनला पोचला. निसर्ग चक्रीवादळामुळे मॉन्सूनच्या महाराष्ट्रापर्यंतच्या वाटचाला वेग मिळाला. त्याने 26 जूनपर्यंत यंदा संपूर्ण भारत व्यापला होता. राज्यात गेल्या तीन महिन्यांमध्ये अकोला, अमरावती आणि यवतमाळ वगळता उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाने सरासरी ओलांडली आहे. सर्वाधिक पाऊस औरंगाबाद जिल्ह्यात पडल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली.
ऑगस्टने महाराष्ट्राला तारले
महाराष्ट्रात सुरवातीलाच पावसाने दमदार हजेरी लावणाऱया पावसाने जुलैमध्ये दडी मारली. मात्र, ऑगस्टमध्ये झालेल्या पावसाने महाराष्ट्राला पाण्याच्या संकटातून बाहेर काढले. 1 जून ते 31 जुलैपर्यंत राज्यात सरासरीच्या तुलनेत जेमतेम पाच टक्के पावसाची नोंद झाली होती. राज्यात 1 जून ते 30 ऑगस्ट दरम्यान सरासरीपेक्षा 17 टक्के जास्त पाऊस पडला. राज्यात 1 जून ते 30 ऑगस्ट दरम्यान 816.2 मिलीमीटर पाऊस पडतो. त्याच्या तुलनेत यंदा प्रत्यक्षात 956.1 मिलीमीटर (17 टक्के) पावसाची आतापर्यंत नोंद झाली आहे.
मॉन्सूनची मराठवाड्याला झुकते माप
दुष्काळी भाग समजल्या जाणाऱया मराठवाड्यातील जिल्ह्यांवर यंदा मॉन्सून मराठवाड्याला झुकते माप दिले. तेथील सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. राज्यात सरासरीच्या तुलनेत सर्वाधिक पाऊस यंदा औरंगाबाद जिल्ह्यात झाला. औरंगाबादमध्ये पावसाळ्याच्या तीन महिन्यांमध्ये सरासरी 405.1 मिलीमीटर पाऊस पडतो. यंदा 739.6 मिलीमीटर (सरासरीच्या तुलनेत 83 टक्के जास्त) पावसाची नोंद झाली.
पुण्यात 40 टक्के जास्त पाऊस
पुण्यात पावसाळ्यातील तीन महिन्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत 40 जास्त पाऊस पडला. यंदा जूनमध्ये पुण्यात पावसाने सरासरी ओलांडली होती. पण, जुलैमध्ये मोठा ‘ब्रेक’ घेतला होता. मात्र, ऑगस्टमध्ये दमदार सरी पडल्या. त्यामुळे सरासरीच्या तुलनेत 40 टक्के पाऊस पडला. जिल्ह्यात तीन महिन्यांमध्ये सरासरी 681.6 मिलीमीटर पाऊस पडत. यंदा 957.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली.