महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २४ जुलै ।। सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता पुणे महानगरपालिकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. पुणे महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंत्यांची भरती केली जाणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही भरती रखडलेली होती. त्यानंतर आता ही भरती प्रक्रिया मार्गी लागली आहे.
पुणे महानगरपालिकेत (PMC Recruitment) १६९ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या पदभरतीमध्ये मराठा आरक्षणाचा आंतर्भव करण्यात आला आहे. यासाठी नवीन सुधारित जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. याआधी ११३ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. त्यानंतर आता ही पदे वाढवण्यात आली आहे. १६९ जागांची भरती केली जाणार आहे.
महापालिकेने जानेवारी २०२४ मध्ये ११३ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यानंतर एसईबीसी आरक्षण लागू झाल्यानंतर ही प्रक्रिया थांबवण्यात आली होती. महापालिकेच्या मागणीनंतर नगरविकास विभागाच्या मार्गदर्शनानुसार आणि विभागीय आयुक्त कार्यालयाच्या बिंदुनामावली तपासणीनंतर सध्या १७१ पदे रिक्त असल्याचे स्पष्ट झाले.
यामधील दोन पदे लाड-पागे समितीनुसार भरती केली आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात फक्त १६९ पदे भरली जाणार आहे.९ जानेवारी २०२४ रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीला प्रतिसाद देणाऱ्या २७,८७९ उमेदवारांपैकी अनेकांची वयोमर्यादा आता पार झाली आहे.
महापालिकेच्या शिफारशीनुसार राज्य शासनाने वयोमर्यादेत सवलत दिली आहे. त्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे.त्यामुळे त्यांचे अर्ज वैध धरले जाणार असून, त्यांना प्रवर्ग सुधारणा करण्याचीही संधी मिळणार आहे. ही सुधारित भरती आयबीपीएसद्वारे राबवण्यात येणार आहे. महापालिका प्रशासनाने यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवला आहे.
याआधी महापालिकेने दोन टप्प्यांत अनुक्रमे ४४८ व ३२० पदांची भरती पूर्ण केली होती. आता सुरू होणारा हा तिसरा टप्पा असून, स्थापत्य शाखेतील कनिष्ठ अभियंत्यांची ही भरती प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर होणार आहे.